रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार इथे प्रस्तावित असलेल्या ऑईल रिफायनरी प्रकल्पासाठी केंद्राने सौदी अरेबिया देशाशी प्रकल्पासंदर्भात करार केला. या करारामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी राजापूरमध्ये केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून व सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. दरम्यान, अरेबियाच्या अधिकाऱ्यांनी नाणारमध्ये पाऊल टाकूण दाखवाच असे आवाहन सेना आमदार राजन साळवी यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या रिफायनरी प्रकल्पाला येथील स्थानिक जनतेचा व शिवसेनेचा तीव्र विरोध आहे. तरी देखील सरकारकडून सौदी अरेबिया येथील अर्माको कंपनी बरोबर करार करण्यात आला. याप्रकरणी शिवसेनेकडून निषेध केला. राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, राजापूर पं. स. सभापती सुभाष गुरव, राजापूर शहरप्रमुख संजय पवार, अवजड वाहतूक सेनेचे दिनेश जैतापकर, विभागप्रमुख तात्या सरवणकर, विभागीय संघटक उमेश पराडकर ह्यांचेसह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.
रिफायनरी प्रकल्प विरोधामुळे पहिल्यापासून वादात सापडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून याप्रकरणी स्थानिकांची भुमिका मांडली. तरीही केंद्रसरकारने सौदी अरेबीयातील अर्माको कंपनीशी करार केला. त्यामुळे भाजपने शिवसेनेच्या पाठित खंजीर खुपसला असल्याचा आरोप राजापूर मतदार संघातील शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केला आहे. तसेच त्यांनी करारासंदर्भात नाराजी व्यक्त केली. केंद्रसरकार स्थानिकांच्या विरोधामुळे आता प्रकल्प लादण्यासाठी सौदी अरेबीयातील कंपनीशी करार केला असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले. हा करार झाला असला तरी शिवसेना प्रकल्प हद्दपार होईपर्यत विरोध करत राहील, अशी भुमिका साळवी यांनी मांडली. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईलने हुसकाऊन लावले जाईल. हिंमत असेल तर सौदी अरेबीयाच्या अधिकाऱ्यांनी नाणार मध्ये पाऊल ठेवून दाखवावे, असे आव्हान त्यांनी यावेळी केले.