रत्नागिरी (आरकेजी): रिफायनरीबाबत केंद्र शासनाने दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेने प्रतिकात्मक पुतळे जाळून निषेध केला. याप्रकरणी शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह ३० शिवसैनिकांवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असूनही केंद्र सरकारकडून सौदी अरेबिया येथील अरामको कंपनीबरोबर करार करण्यात आला. त्याचे गुरुवारी राजापूरात जोरदार पडसाद उमटले. केंद्रसरकारच्या या धोरणाच्या निषेधार्थ राजापूर येथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एवढेच नव्हे तर केंद्रसरकारचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी दहन केले. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अप्पर जिल्हाधिकारी यांनी मुंबई अधिनियम ३७ (१), (३) अन्वये दिनांक २ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला होता. मात्र मनाई आदेशाचे उल्लंघन करून आमदार साळवी यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केंद्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. या पार्श्वभूमीवर आमदार साळवी, सभापती सुभाष गुरव यांच्यासह ३० पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन येत्या काही दिवसांत आणखी व्यापक होण्याची चिन्हे आहेत.