मुंबई : मुंबई महाराष्ट्राची होती, आहे आणि राहणार, असे सुनावत मुंबई-महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला नख लावायचा जरी प्रयत्न केलात, तर संपूर्ण महाराष्ट्रात धिंगाणा घालू, असा इशाराच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला.
नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, असे आदर म्हणून बोललो होतो, आधी काय बोललो ते तेल लावत गेले, असे सांगायलाही राज विसरले नाहीत.
गुजरातेतील अहमदाबाद ते मुंबई हा प्रवास दोन तासांत प्रवास पूर्ण करण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. त्यासाठी १ लाख १० हजार कोटींचे कर्ज घेतले जात आहे. मुंबई गुजरातला जोडली जावी हे त्यांचे जुने स्वप्न आहे, त्याठीच हे उद्योग सुरू आहेत, असा आरोपही राज यांनी केला.
प्रभादेवीतील रवींद्र नाटयमंदिरात राज ठाकरेंच्या फेसबूक पेजचे अनावरण आज झाले. त्यावेळी राज बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर तीव्र टीका केली.
दाऊदला भारतात यायचे आहे…
अंडरवर्ल्ड डॊन दाऊद इब्राहिमला भारतात परतायचे आहे, त्यासाठी तो केंद्राशी बोलणी करत आहे. आता त्याचा फायदा उचलण्याची तयारी भाजपाने सुरू केला आहे. दाऊदला आम्ही भारतात आणले. काँग्रेसला ते जमले नाही, असे भाजपला भासवायचे आहे आणि पुढच्या निवडणुका लढवायच्या आहेत, असा गौप्यस्फोटच राज यांनी केला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.