रत्नागिरी (आरकेजी) : रिफायनरीला प्रखर विरोधानंतरही सरकार प्रकल्प रेटत असल्याची कैफियत यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सरकारमध्ये राहून काय करते ? असा सवाल करत मनसे प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असल्याचं विश्वास प्रकल्पग्रस्तांना दिला. कोकण दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांची आज नाणार प्रकल्पग्रस्तानी राजापूरमध्ये भेट घेतल्यानंतर ते बोलत होते.
गेल्या काही माहिन्यांपासून कोकणातल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय वादळ निर्माण झालं आहे. भाजप सोडल्यास सर्वच पक्ष या प्रकल्पाच्या विरोधात आहेत. पण या प्रकल्पावरून भाजपने शिवसेनेवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडलेली नाही. त्यातच स्थानिकांचा प्रखर विरोध असतानाही भाजप सरकारने हा प्रकल्प पुढे रेटण्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक जनता पुन्हा आक्रमक झाली आहे. आणि याच मुद्द्यावरून प्रकल्पग्रस्तांनी आज कोकण दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची राजापूरमध्ये भेट घेत आपली कैफियत मांडली. यावेळी राज ठाकरे यांनी आपण, आपला पक्ष प्रकल्पग्रस्तांसोबत असल्याचं विश्वास देत, आम्हाला जे काय करायचय ते आम्ही करू असं सांगितलं. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये आमिषाला बळी पडून जमिनी विकू नका असं आवाहनही राज ठाकरे यांनी प्रकल्पग्रस्तांना केलं. दरम्यान शिवसेनेवरहि या प्रकल्पावरून राज ठाकरे यांनी तोंडसुख घेतलं. प्रकल्प पुढे रेटण्याच्या हालचाली सुरू असताना, सरकारमध्ये असलेली शिवसेना काय करते ? असा सवाल राज ठाकरे यावेळी उपस्थित केला. नाणारचा विषय संपला असं शिवसेनापक्षप्रमुख म्हणाले होते. मग प्रकल्पाचं काम पुढे का जातंय? असाहि प्रश्न राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.