
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कल्याण डोंबिवली महापालिका विभागात मनसैनिकांचा आवाज बुलंद होण्यासाठी ‘राज ठाकरे’ ठाकरे शैलीत सत्ताधाऱ्यांवर ‘स्ट्रोक’ मारतील अशी भाबडी इच्छा मनसेच्या सैनिकांत होती. ‘राज’ आले त्यांनी दोन ठिकाणी रिबिनी कापल्या आणि ते गेले. त्यांच्या येण्या-जाण्यात फक्त घोषणांची बोंब झाली. राजकीय गुलाबी वातावरणात ‘राज’ सडकून प्रहार करतील अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा मात्र गोठून गेली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर तर्फे जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे डोंबिवलीत शनिवारी आले होते. ठाकरे यांनी सकाळी 10 वाजता मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यांच्या पलावा, डोंबिवली पूर्वे येथील ‘योगीराज’ कार्यालयास भेट दिली. त्यानंतर दुपारी 12 वाजता पूर्वेकडील सुनीलनगर येथील विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष सागर जेथे यांच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. तसेच 12:30 वाजता कडोंमपाचे विरोधी पक्ष नेते मंदार हळबे यांच्या पूर्वेकडील राजाजी पथ येथील नूतन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्या बरोबर मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, शहर अध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, मंदार हळबे, सागर जेधे, सरोज भोईर, ज्याती मराठे, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, राज ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाई परिसर दणाणून गेला.
विशेष म्हणजे ठाकरे यांनी दोन्ही वेळा फक्त ‘फीत’ कापली परंतु उपस्थित पत्रकार आणि मनसैनिकांना फक्त नमस्ते करून पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण केले. या त्यांच्या वेगळ्या शैलीचे आश्चर्य व्यक्त झाले. राज आले पण काहीच बोलले नाहीत हीच चर्चा शहरात होती.
दरम्यान घावत्या भेटीत उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष अनिकेत घमडी यांनी विचारले कि, 5 ओक्टॉबर 17 रोजी राज ठाकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनांसोबत मध्य रेल्वेच्या प्रबंधकाची भेट घेतली होती महिला स्पेशल ट्रेन सुरू करणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी ट्रेन मध्ये प्रवेश करताना रॅम्प लावणे व 5 व 6 ट्रॅक सुरू करणे असे प्रश्न मांडले होते व वारंवार या संदर्भात संपर्क करू असे ठोस आश्वासन दिले होते. पण गेल्या दीड वर्षात एकही प्रश्न सोडवण्यास यश आले नाही. याबद्दल ठाकरे म्हणाले, निवडून देताना ‘ते’ व समस्या सोडवायला आम्ही, हे सूत्र जमणार नाही’ असे उत्तर देऊन सर्वांनाच चकित केले.
पलावा येथील राजू पाटील यांच्या कार्यालयात शनिवारी सकाळी राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने मनसे कार्यकर्ते अवाक झाले. याबद्दल तपासे यांना विचारले असता त्यांनी शरद पवार यांचा निरोप दिला असे सांगितले व सदिच्छा भेट घेतली असेही सांगितले.
















