रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातल्या ग्रामस्थाची आज (शनिवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेट घेणार आहेत. त्यामुळे ते आज या प्रकल्पाबाबत मनसेची भूमिका काय जाहीर करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. त्यातच या प्रकल्पाबाबतची मनसेची भूमिका राज ठाकरे जाहीर करणार आहेत. गेल्या महिन्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी नाणार परिसरात भेट देऊन ग्रामस्थाची भूमिका जाणून घेतली होती. तसेच राज ठाकरे याबाबत स्वतः भूमिका जाहीर करतील असं नांदगावकर यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार राज ठाकरे हे शुक्रवारपासून जिल्हा दौऱ्यावर आले असून, शनिवारी ते नाणार परिसरातील ग्रामस्थाची संवाद साधणार आहेत. नाणार आणि पंचक्रोशीतल्या विविध गावांमधल्या लोकांशी ते थेट संवाद साधणार आहेत. त्यानंतर या आईल रिफायनरी प्रकल्पाबाबत ते भुमिका जाहिर करणार आहेत. त्यामुळे आईल रिफायनरीच्या विरोधात मनसे आपले दंड थोपणार का हे राज यांच्या उद्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या भेटीतून सष्ट होईलच. त्यामुळे गेले काही दिवस चर्चेत असलेल्या या प्रकल्पाबाबत मनसेची भुमिका काय रहणार हे महत्वाचे असणार आहे.