मुंबई : फेरीवाल्यांविरोधात शंख फुकणाऱ्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरच फेरीवाल्यांना बसण्याची जागा महापालिकेने निश्चित केल्या आहेत. या जागे निश्चितिला मनसेने विरोध केला असून याबाबत बुधवारी आपली भूमिका ठरवणार आहे. त्यामुळे फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला येणार आहे.
मुंबईमध्ये फेरीवाल्यांना आपला धंदा करता यावा म्हणून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात होती. मात्र एल्फिस्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आवाहन पालिका आणि पोलिसांना केले होते. महापालिकेने कारवाई न केल्यास मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन करण्याचा ईशारा राज ठाकरे यांनी दिला होता. यादरम्यान पालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरु झाली. यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने केंद्र सरकारने बनवलेल्या फेरीवाला धोरणानुसार फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईत २४ विभागात एकूण १३६६ रस्त्यांवर ८५ हजार ८९१ फेरीवाले बसवण्यासाठी एक यादी जाहीर केली आहे. महापालिकेने याबाबत सूचना व हरकती मागवल्या आहेत. पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार मनसेचे मुख्यालय असलेल्या पद्माबाई ठक्कर मार्गावरील राजगड कार्यालयाबाहेर १०० तर शिवाजी पार्क येथील केळुस्कर रोडवर असलेल्या राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवास स्थानाबाहेर १० फेरीवाले बसवण्यास पालिकेने मंजुरी दिली आहे. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या बांद्रा कलानगर येथील मातोश्री बंगल्याच्या आजूबाजूला एकही फेरीवाला बसवण्यात आलेला नाही. यामुळे मनसेकडून याविरोधात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार शिवसेनेच्या सेनाबाहेर एनसी केळकर मार्गावर १००, भवानी शंकर रोडवर २००, गोखले रोडवर २०० असे ५०० तर भाजपचे कार्यालय असलेल्या दादर येथील फाळके रोडवर ३१० फेरीवाले बसवले जाणार आहेत.