रत्नागिरी (आरकेजी): अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) रत्नागिरी भाग व रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने ‘रेन वॉटर हार्वेस्टींग – काळाची गरज’ जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होती, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. येत्या 15 जूनला सायंकाळी 5ः30 वाजता वाचनालयाच्या सभागृहात कार्यशाळा होईल. यात या क्षेत्रात 20 वर्षे कार्यरत मुंबईतील तज्ञ मार्गदर्शक संदिप अध्यापक (वॉटर फिल्ड रिसर्च फांऊडेशन, ठाणे) मार्गदर्शन करणार आहेत.
ग्रामीण व शहरातील विविध भागात पाणी टंचाईत वाढ होत आहे. ग्रामीण भागात लोकसहभागातून जलयुक्त शिवार, गाळयुक्त शिवार, वनराई बंधारे, शोष खड्डे या माध्यमातून टंचाईवर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र शहरी भागात टंचाईवर उपाययोजना करणे ही कोणा एकदोघांची जबाबदारी नाही. सर्व नागरिकांचे हे आद्य कर्तव्य आहे. शहरात बाहेरून पाणी आणून तहान भागवली जाते व पाण्याची उधळपट्टी देखील होते. यावर उपाय योजना शोधताना त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या न राबविता दीर्घकालीन, शाश्वत अशा असतील तर अशी परिस्थिती पुन्हा येणार नाही. शाश्वत उपाययोजनांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. कमीत कमी खर्चात योजना राबविली तर टंचाईची तीव्रता कमी होण्यास फायदा नक्की होईल, ती पद्धत म्हणजे रेन हार्वेस्टींग. रेन वॉटर हार्वेस्टींग म्हणजे इमारतीच्या छतावरून पडणारे पावसाचे पाणी पाईपद्वारे भूमिगत खड्डयात पोहोचवणे किंवा बोअरवेलमध्ये जिरवणे होय. रेन वॉटर हार्वेस्टींगमुळे फक्त पावसाचे पाणी भूगर्भात जिरवणे एवढेच नाही तर आपल्या सोसायट्यांमध्ये परिसरात भुमिगत खड्डयांमध्ये साठवून त्यांचा पुनर्वापर गाड्या धुणे, बाग-बगिच्यासाठी व इतर स्वच्छतेसाठी वापरणे शक्य होणार आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानही उपलब्ध आहेत. यासाठी शहरातील सर्व हौसिंग सोसायट्यांनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे. हौसिंग सोसायटीचे प्रतिनिधी तसेच इमारती, बंगलो, घरे यांच्या मालकांनी शहरातील जबाबदार नागरिक म्हणून उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन, अनुलोमचे भाग जनसेवक रविंद्र भोवड व उपविभाग जनसेवक स्वप्निल सावंत यांनी केले आहे.