रत्नागिरी (आरकेजी): गेले तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी विश्रांती घेतली. त्यामुळे सुर्यकिरणांचे दर्शन झाले असून विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
शुक्रवारपासून पावसाने जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले होते. त्यामुळे गेले दिवस दिवसाला सरासरी 150 मिमी पेक्षाही जास्त पाऊस जिल्ह्यात पडत होता. दक्षिण रत्नागिरीतील राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यात तर 200 मिमी पेक्षाहि जास्त पाऊस दिवसाला पडला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं होतं. अनेकांच्या घराचं नुकसान झालं, तर अनेक ठिकाणी झाडं, दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती. तर शेतीची कामही गेले तीन दिवस पावसामुळे खोळंबली आहेत. काही ठिकाणी पेरणी केलेलं धान्यही वाहून गेले आहे. पण आज तीन दिवसानंतर पावसाने अखेर उघडीप दिली. आणि तीन दिवसानंतर चक्क सूर्यकिरणांचं दर्शन झाले. आकाश पूर्ण निरभ्र असून कुठेही ढगाळ वातावरण नाही. त्यामुळे आता खोळंबलेल्या शेतीच्या कामांना वेग येणार आहे. दरम्यान 1 जूनपासून आजपर्यत जिल्ह्यात 3600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरी 400 मिमी पाऊस पडला आहे.