रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीत बुधवारपासून कोसळधार सुरु आहे. आज पहाटेपासून मुसळधार पावसामुळे जनतेची त्रेधातिरपीट उडाली. विजांच्या कडकडाट, वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्याने चार दिवस मुसळधार पाऊस होईल, असे संकेत दिले होते. हा अंदाज खरा होताना दिसत आहे.
गेल्या २४ तासांत दक्षिण कोकणात मुसळधार पाऊस पडला आहे. गेल्या चौविस तासात रत्नागिरी जिल्ह्यात ८२ मिलिमिटर पाऊस झालाय. सर्वात जास्त पावसाची नोंद झालीय ती राजापूर तालुक्यात इथं २६४ मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. त्याखालोखाल गुहागरात १४८ मिलिमिटर, रत्नागिरीत ८५ मिलिमिटर, खेडमध्ये ८४ मिलिमिटर आणि संगमेश्वरात ६२ मिलिमिटर पावसाची नोंद झालीय. जूनपासून अत्तापर्यत पावसानं ५०० मिलिमिटरचा टप्पा ओलांडलाय. कालपासून सुरु असलेल्या पावसानं सर्वच नद्या दुथडी भरून वहातायत. सध्या नदीचं महाकाय रुप आजच्या पावसात पहायला मिळतंय. रत्नागिरी जवळची काजळी नदी सुद्धा दुथडी भरून वहातेय. या पावसामुळे रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत पाणी साचले. या साचलेल्या पाण्यामुळे अनेक दुकानदारांना आणि पादचाऱ्यांना त्रास झाला….सकाळ पासून कोसळत असलेल्या पावसामुळे नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाच्या कोसळधार सुरुच असल्याने सध्या कोकणातला शेतकरी शेतात राबताना पहायला मिळतोय. दरम्यान मुसळधार पावसामुळे आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.