रत्नागिरी (आरकेजी): सलग तिसऱ्या दिवशी रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ सुरुच आहे. आज दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. मुसळधार पडलेल्या पावसाने अनेकांची धावपळ उडाली.
मान्सून आता कोकणच्या उंबरठ्यावर आहे. येत्या काही दिवसांत कोकणात मान्सूनचे आगमन होईल, मात्र तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मान्सूनपूर्व पावसानं रत्नागिरीत धुमाकूळ घातला आहे. सकाळी कडकडीत उन आणि दुपारनंतर मुसळधार पाऊस असं काहीसं चित्र सध्या रत्नागिरीत पहायला मिळत आहे. दरम्यान गेल्या 24 तासांत रत्नागिरी , चिपळूण ,संगमेश्वर , देवरुख आदी भागात दमदार पाऊस कोसळला आहे.गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 258 मिलिमिटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरी 28.67 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस संगमेश्वर तालुक्यात पडला आहे. 74 मीमी इतक्या पावसाची नोंद संगमेश्वर मध्ये झाली आहे. त्याखालोखाल रत्नागिरीत 49 मिमी पाऊस पडला आहे. दरम्यान प्राथमिक अहवालानुसार पावसामुळे खेड तालुक्यात मौजे सुकिवली येथील चेतन देवजी निकम यांचे पावसामुळे घराचे अंशत: रु. 6 हजारचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात मौजे उंबरोली येथे ज्ञानोबा महिपत घोडके यांच्या घरावर वीज पडून अंशत: नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यात मौजे वाशी तर्फे रत्नागिरी येथे हील हॉटेल जवळील रस्त्यावर झाड पडले. मौजे देवळे येथील विनायक जयराम बागवे यांच्या घराचे अंशत: नुकसान, मौजे शृंगारपूर येथे गजानन शंकर सुर्वे यांच्या घरावर वीज पडून घराचे अंशत: नुकसान झाले आहे.