रत्नागिरी : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा परिणाम कोकणात सलग दुसऱ्या दिवशी जाणवला. मंगळवारी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होतं, तर अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला.
रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात दुपारनंतर रिमझिम पाऊस झाला. तर अरबी समुद्रातील कमी दाब्याच्या पट्यामुळे आज देखील कोकणातल्या मासेमारीला ब्रेक लागलेला पहायला मिळाला. रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी नौका आज सुद्धा किनाऱ्याला विसावल्या होत्या. मच्छिमारांनी आज आपल्या बोटी खोल समुद्रात पाठवल्या नाहीत. तर दुपारनंतर रत्नागिरीत सुद्धा रिमझिम पाऊस झाला. आणखी दोन दिवस कोकणातलं वातावरण ढगाळ असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
मात्र या ढगाळ हवामानामुळे आंबा बागायतदार मात्र धास्तावलेत. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे हंगामी पिकांना धोका असल्याचे व्यक्त होत आहे. तसेच काहि ठिकाणी काजू-आंबा पिकाला पालवी फुटल्याचे दिसून येत आहे. मात्र या अवकाळी पावसाने आलेली पालवी गळून पडण्याची शक्यता आहे. यामुळे आंबा- काजुचे नुकसान होणार आहे. असेही तर्क वितर्क काढले जात आहे.