रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : जिल्हयात पावसाची संततधार कायम आहे. तर गुहागरला झोडपून काढले. मागील चौवीस तासात जिल्ह्यात सरासरी 70.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दोन दिवस मुसळधार पडत असलेल्या पावसाने आज सकाळी काही वेळ विश्रांती घेतल्याचं चित्र होतं, त्यानंतर मात्र पावसाने जोर धरला. गेल्या 24 तासांत सर्वाधिक पाऊस गुहागर आणि दापोली तालुक्यात पडला आहे. गुहागर तालुक्यात तब्बल 146 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले तीन दिवस गुहागरमध्ये 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडत आहे. तर दापोली तालुक्यात 128 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मंडणगड- 40 मिमी, खेड- 80 मिमी, चिपळूण-54 मिमी, संगमेश्वर- 40 मिमी, रत्नागिरी – 92 मिमी, लांजा 22 मिमी आणि राजापूर तालुक्यात 30 मिलीमीटर पाऊस गेल्या 24 तासांत झाल्याची नोंद झाली आहे. दरम्यान 1 जून पासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 722.39 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान प्राथमिक अहवालानुसार पावसामुळे दापोली तालुक्यात मौजे दाभिळ येथील दिलारा जैनुदिनन दांडेकर यांच्या घराचे रु.18 हजार 700 रुपयांचे तर अरुण धोंडू काटकर यांच्या घराचे रु. 8 हजार 150 रुपयांचे आणि शकुतला विठ्ठल जाधव यांच्या घराचे रु.16 हजार 600 रुपयांचे अंशत: नुकसान झाले आहे.
राजापूर तालुक्यात मौजे दुर्गवाडी येथे बंधारा व रस्ता पावसामुळे वाहून गेला. जिवीत हानी नाही. मौजे पांगारे येथे भालचंद्र पांगारकर यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
सुरक्षितेचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून पर्जन्यविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 22 जून ते 26 जुन 2018 रोजी या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.