मुंबई: रेल्वेत विकल्या जाणा-या खान पान पदार्थांच्या पॅकेटवर एमआरपी छापणे बंधनकारक नाही, असे निर्देश रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहेत. बोर्डाकडून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार असल्याने एमआरपी पेक्षा जास्त दराने पदार्थ विकणा-या विक्रेत्यांची चांदी होणार आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
रेल्वे बोर्डच्या टुरिझम आणि कॅटरिंगचे अतिरिक्त सदस्य संजीव गर्ग यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशानुसार एक निर्देश जारी केला आहे. त्यात खान पान पदार्थावर पुरवठादार किंवा कंत्राटदारांचे नाव, शाकाहारी किंवा मांसाहारी, वजन आणि पॅकिंग दिनांक याचा उल्लेख केला आहे. मात्र खानपानवरील एमआरपी किती आहे हेच वगळण्यात आले आहेत. त्यामुळे जास्त दराने पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची चांदी होणार आहे. रेल्वेत एमआरपी पेक्षा जास्त भावाने खान पान पॅकेट विकण्याच्या सर्वाधिक तक्रारी असताना हीच बाब वगळल्याचे गलगली यांनी सांगितले. तसेच पॅकेटवर एमआरपी छापण्याची मागणी रेल्वे मंत्री पियूष गोयल व संजीव गर्ग यांस लेखी पत्र पाठवून केली आहे.