Mumbai : रेल्वे संरक्षण दलाचे आरपीएफ कर्मचारी नेहमीच आघाडीवर असतात आणि रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी चोवीस तास जागरुक राहतात. याबरोबरच त्यांनी इतर कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील शेकडो रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवले आहे.
“मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या आरपीएफ कर्मचार्यांनी २०२१ मध्ये मुंबई उपनगरीय प्रणालीवर काही वेळा स्वतःचा जीवही धोक्यात घालून आतापर्यंत ४७ व्यक्तिंचे लोकांचे प्राण वाचवले आहेत. यापैकी काही जीव वाचवणाऱ्या घटनांचे व्हिज्युअल्स प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत आणि सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
रेल्वे संरक्षण दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, अतिरेकी हिंसाचार, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा आणण्या-यांचा बंदोबस्त, बेपत्ता मुलांची सुटका करणे आणि रेल्वेगाड्या आणि रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे अशा विविध सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. या सगळ्यासह ते प्रवाशांच्या सुरक्षेवर बारीक लक्ष ठेवून असतात.
बहुतेक प्रकरणांमध्ये सतर्क आरपीएफ ने अशा प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत, जे काहीवेळा निष्काळजीपणा करतात आणि धावत्या ट्रेनमध्ये चढताना किंवा उतरताना धोक्याचा सामना करतात. काही वेळा विविध वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्येचा प्रयत्न करताना जीव वाचवण्यात आला आहे. पण सरतेशेवटी, तारणकर्त्यांच्या या कृतीचा परिणाम आनंद आणि आरपीएफ जवानांप्रती शब्दांत व्यक्त न होणारी कृतज्ञता यात होतो.
या वर्षी २०२१ मध्ये, ११ प्रकरणे कल्याण स्थानकावर, १० प्रकरणे दादर येथे, ६ ठाणे, ४ लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल येथे ३, कुर्ला आणि वडाळा रोड येथे प्रत्येकी २ तसेच तुर्भे, टिटवाळा, रोहा, कसारा, डोंबिवली, घाटकोपर, भायखळा, दिवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेन लाइन स्थानकांवर प्रत्येकी १ प्रकरणांत, अशा प्रकारे मुंबई उपनगरी/गैर उपनगरीय नेटवर्कवर, ४७ जीव वाचविण्यात आले.
त्यापैकी बहुतेक लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढताना किंवा डी-बोर्डिंग करताना वाचले. अलीकडे दि. २६.१२.२०२१ रोजी, आरपीएफ कॉन्स्टेबल, श्री राजू पुनिया यांनी ठाणे स्टेशनवर कर्तव्य बजावत असताना, आझमगड, उत्तर प्रदेश येथील रहिवासी श्री राम प्रवेश बिहारी यांना धावत्या ट्रेन 11055 डाउन गोदान एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना खाली घसरताना पाहिले. ट्रेनच्या गार्डनेही हे पाहिलं आणि त्यांनी तात्काळ प्रेशर सोडून ट्रेन थांबवली. त्यामुळे प्रवाशाला मृत्यूपासून वाचवलं. दुसर्या घटनेत, आरपीएफ कॉन्स्टेबल आरके मीणा यांनी दि. १७.१२.२०२१ रोजी पनवेल स्थानकावर प्लॅटफॉर्मवर कर्तव्य बजावत असताना पनवेल -गोरखपूर ट्रेन क्र.15066 मध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवाशी श्रीमती ज्ञान देवी रहिवासी कामोठे, पनवेल या घसरून ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडताना दिसल्या. त्यांनी ताबडतोब कृती करून प्रवाशाला सुरक्षित ठिकाणी खेचले आणि तिचा जीव वाचवला.
रेल्वे संरक्षण दलाचे हे शूर जवान त्यांच्या सतर्कतेने आणि धैर्याने अनेक प्रवाशांचे प्राण वाचवून देवदूत बनले आहेत.
















