मुंबई : गेल्या दहावर्षात मुंबई महापालिकेने पुलांच्या दुरुस्तीसाठी रेल्वे प्रशासनाला ११४ कोटी दिले. मात्र, त्यानंतरही पूल दुर्घटना घडत असल्याने मुंबईतील पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाढत्या दुर्घटनांमुळे महापालिकेनेरेल्वे प्रशासनाला दिलेला कोट्यवधीचा निधी गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
मुंबईत महापालिकेच्या हद्दीत २७४ तर रेल्वेच्या हद्दीत ४५५ पूल आहेत. एल्फिस्टन येथील दुर्घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अंधेरी येथील गोखले पुलाच्या दुर्घटनेत २ जणांचा तर सीएसटी येथील पूल दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून ३१ जण जखमी झाले. या मृत्यूला निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. एल्फिस्टन आणि अंधेरी येथील पुलांच्या दुर्घटनेनंतर पुलांचे स्टक्चरल ऑडीट करण्यात आले. हिमालय पूलाचेही ऑडिट करण्यात आले होते. त्यात काही छोट्या दुरुस्त्या सुचवण्यात आल्या. पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव मंजूर करावा म्हणून स्थायी समितीकडे सादर करण्यात आला. हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी येणार होता. त्याच्या आधी सीएसटी जवळील पादचारी पूल कोसळला आहे. पूल कोसळल्यावर रेल्वेने आपली जबाबदारी झटकली. मात्र, पालिकेच्या पूल विभागाने २०१० पासून २०१८ पर्यंत मध्य रेल्वेला ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये तर पश्चिम रेल्वेला २००८ ते २०१८ या कालावधीत १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये असे एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये पुलांच्या डागडुजीसाठी दिले. मात्र हा निधी रेल्वेने कुठे खर्च केला, याबाबत रेल्वेने महापालिकेला अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही. तसेच पाठपुरावा करण्यास पालिकेकडे कोणताही विभाग नाही. त्यामुळे निधीचा खरचं विनियोग झाला, किती पुलांची आतापर्यंत यानिधीतून दुरुस्ती करण्यात आली, याची माहिती पालिकेकडे उपलब्ध नसल्याची माहिती, सूत्रांनी दिली.
असा दिला निधी
– मध्य रेल्वे – ९४ कोटी ४४ लाख ९१ हजार ८७० रुपये
– पश्चिम रेल्वे – १८ कोटी ५ लाख २४ हजार १७३ रुपये
– एकूण ११४ कोटी ५० लाख १६ हजार ४३ रुपये















