रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी) : कोकण रेल्वे भरतीत स्थानिकांना डावलल्याने कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांनी २३ एप्रिल रोजी रेलरोको करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीने रेलरोकोची हाक दिली आहे.
कोकण रेल्वेच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी भरती प्रक्रिया आॅनलाईन पद्धतीने करण्याचे जाहीर केले होते. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने रेलरोको करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांची बैठक पार पडली. विविध राजकीय पक्षांनी कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या या रेल रोकोला पाठिंबा दिल्याने मोठे बळ मिळेल, असे बोलले जात आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगडमधील प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होतील, अशी माहिती समितीने दिली.