डोंबिवली : भगवंताचा धावा करुन भजन गाऊन तुम्ही तुमचा दररोजचा लोकल प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न करता तसाच दत्त गुरुंच्या आशिर्वादाने तुम्हा सर्वांचा जीवनप्रवासही आनंदमय व्हावा हीच माझी प्रार्थना असे प्रतिपादन भाजप नगरसेविका मनिषा धात्रक यांनी केले. त्रिमुर्ती सेवा प्रासादिक भजन मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्या बोलत होती.
विरंगुळ्यासाठी लोकल प्रवासात हौस म्हणून भजने म्हणता म्हणता पंचवीस वर्षात डोंबिवलीतील एक चांगले भजन मंडळ म्हणून त्रिमुर्ती नावारुपाला आले आहे. मुंबईची जीवनरेखा म्हणजेच लोकलचा धकाधकीचा प्रवास करत असताना सहप्रवासी एकत्र येऊन विरंगुळा शोधतात. कंटाळवाण्या प्रवासात आपआपल्या उतरण्याच्या स्टेशनपर्यंत काही आनंदाचे क्षण आपल्या आवडीप्रमाणे निवडून प्रवास अल्हाददायक व्हावा ही प्रत्येक प्रवाशाची इच्छा असते.
याच समविचाराने एकत्र येऊन 1993 मध्ये आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस येथून सध्या सायंकाळी 5-43 वाजता आसनगावसाठी सुटणाऱ्या लोकलमध्ये सहाव्या डब्यातील सुरेशबुवा करंबेळकर, बाबी पवार, शिवाजी देसाई, सुनील कुलकर्णी, संजय बिडू अशा प्रवाशांनी डोंबिवली पर्यंतच्या प्रवासात टाळ्या वाजवून भजने म्हणण्यास सुरवात केली. बहुतांश सरकारी कर्मचारी असलेल्या या मंडाळींबरोबर भजने म्हणणारी बुवा मंडळी व इतर नवीन सभासद जोडत गेले. स्थापनेच्या वेळचे अनेक सदस्य आता सेवानिवृत्त होत असले तरी नवनवीन सभासदांमुळे आता सुमारे चाळीस सदस्य दररोज या भजन प्रवासाचा भाग होतात. डोंबिवलीच्या गणपती मंदिरातील विनायक सभागृहात रविवारी या त्रिमुर्ती सेवा प्रासादिक भजन मंडळातर्फे रौप्यमहोत्सवा निमीत्त संपूर्ण दिवसाचा भजनाचा व कौटुंबिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीधर स्वामींचे शिष्य वसंत गोडसे व सुधीर साटम या मान्यवरांचा सत्कार नगरसेविका धात्रक यांच्या हस्ते करण्यात आला.
दररोज मुंबईहून येताना लोकलमध्ये भजनासाठी टाळ मृदुंग साहित्याची दररोज ने आण करण्याची सेवा विनायक घडसी करतात. पचवीस वर्षाच्या प्रवासात मंडळाने चांगलेच नाव मिळवले असून डोंबिवली व आसपासच्या भागातून विविध उत्सव कार्यक्रम, पूजा या प्रसंगी भजनाच्या कार्यक्रमासाठी बोलविण्यात येते. मध्यंतरी रेल्वेने लोकल मधील भजनी मंडळांवर बंदी आणली होती याबाबत विचारले असता या मंडळास लोकलमधील भजनी मंडळांसाठी कार्यरत असलेले महेश मोरे यांच्या प्रयत्नाने रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडून विशेष परवानगीपत्र मंडळास मिळाले असल्याची माहिती संजय बिडू यांनी दिली.