नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणा-या रायगड किल्याचे संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी राज्य सरकारने आखलेल्या ६०० कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्राकडून तत्वत: मंजुरी देण्यात आली. रायगडसह राज्यातील शिवकालीन गड-किल्यांच्या संवर्धन व सौंदर्यीकरण कार्यास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
रायगडसह राज्यातील गड-किल्ले व प्रसिध्द गुहांच्या संवर्धन व सौंदर्यीकरण कार्यात येणा-या अडचणीवर मार्ग काढण्यासाठी आज केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री डॉ. महेश शर्मा यांच्या अध्यक्षतेत परिवहन भवन येथे झालेल्या बैठकीनंतर फडणवीस बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव एन.के.सिन्हा, सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव विनोद जोशी, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे महासंचालक डॉ. राकेश तिवारी , मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आणि कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख या बैठकीस उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, शिवकालीन गड-किल्यांशी राज्यातील जनतेच्या भावना खोलवर जुळल्या आहेत. या गड-किल्यांचा ऐतिहासिक वारसा पर्यटनाच्यादृष्टीने महत्वाचे माध्यम असल्याने त्यांचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे. रायगड किल्याच्या संवर्धन व सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनाने ६०० कोटी रूपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्राकडे सादर केला त्यास आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
राज्यातील गड-किल्यांचे संवर्धन व सौंदर्यीकरण करण्यासाठी केंद्रशासनाच्या अखत्यारीतील पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून आवश्यक असणारी मंजुरी आणि पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडून आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे. आजच्या बैठकीत केंद्राकडून आवश्यक मदतीची मागणी करण्यात आली त्यास डॉ. महेश शर्मा यांनी सहमती दर्शविली. राज्य शासनाला या कामी विशेष अधिकार देण्यात येतील. तसेच, राज्याकडून केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्रालयाकडे आलेल्या कोणत्याही प्रकल्पासंदर्भात २ आठवडयाच्या आत निर्णय घेण्यात येणार असे आश्वासनही या बैठकीत डॉ. शर्मा यांनी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
रायगड किल्याचे संवर्धन आणि किल्यावर पर्यटक व शिवप्रेमींसाठी आवश्यक असणा-या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यशासनाने सविस्तर आरखडा तयार केला. या आरखडयाचे सादरीकरण आजच्या बैठकीत करण्यात आले. यात रायगड किल्यावरील चित्ता दरवाजा, नाना दरवाजा, खुबल्दा बुर्ज , महादरावाजा आदींचे संवर्धन व जिर्णोध्दार करणे. तसेच, पर्यटक व शिवप्रेमींना रायगडावर पोहचण्यासाठी मजबूत पायवाटा निर्माण करणे, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आदी महत्वाच्या सोयी उपलब्ध करून देणे, जलसंवर्धन करणे या बाबींचा समावेश आहे. पाचड येथील राजमाता जिजाऊ समाधी व जिजामाता वाडा यांच्या संवर्धन व जिर्णोध्दाराचे कार्य तथा याठिकाणी पर्यटकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य शासनाने आखलेल्या आराखडयाचे सादरीकरण करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हयातील सिंधुदुर्ग किल्ला(मालवण किल्ला), रायगड जिल्हयातील एलिफंटा द्विप, विदर्भातील बुध्दीष्ट सर्कीट विकास कार्याबाबत यावेळी चर्चा झाली.
राज्यात एकूण ३३६ गड- किल्ले असून ४० पेक्षा जास्त गड-किल्ले हे केंद्रशासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अख्त्यारीत येतात. यातील १८ किल्यांच्या संवर्धन व जिर्णोध्दाराचे कार्य राज्य शासनाने हाती घेतले आहे.
गड किल्यांसह राज्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अंजिठा, वेरुळ आणि एलिफंटा गुंफाच्या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाच्यावतीने आवश्यक मदत पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. शर्मा यांनी याबैठकीत सांगितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले