मुंबई : रायगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने ६०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजूरी दिली आहे. रायगड किल्ल्यावर जलवाहिनी टाकण्याची योजना प्रस्तावित असून पुरातत्व विभागाने त्यास मंजुरी दिल्यानंतर पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल व गडावरील झाडांना पाणी देण्याची सोय उपलब्ध होईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य अतुल भातखळकर यांनी या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले की,वृक्षारोपणाच्या उपक्रमातून लावण्यात आलेल्या झाडांपैकी सात हजार झाडे जगविण्यात आली आहेत. लागवड केलेल्या झाडांचे संगोपन करण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता आहे. नवीन आराखड्यात याठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिनीची योजना प्रस्तावित असून त्यास भारतीय पुरातत्व खात्याने मंजुरी दिल्यास पाणी प्रश्न मिटणार आहे. यावेळी सदस्य भरत गोगावले, प्रशांत ठाकूर यांनी चर्चेत सहभाग घेतला.