मुंबई : रायगड किल्ल्याच्या जतन, संवर्धन व विकासासाठी ६०६ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली असून त्यात निश्चित करण्यात आलेली सर्व कामे गतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आज यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, खासदार छत्रपती संभाजीराजे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील सर्व किल्ले, ऐतिहासिक वास्तुंचे जतन आणि पर्यटनदृष्ट्या त्यांचा विकास होणे महत्वाचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून रायगड किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच किल्ल्यावर आणि किल्ला परिसरात पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी ८ लाख रुपयांचा आराखडा तयार करुन त्यास मान्यता दिली आहे. यातील बरीचशी कामे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मान्यतेने व त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे करणे अपेक्षित आहे. त्यानुसार या विभागाच्या मान्यतेने प्रस्तावित असलेली विविध कामे गतीमान पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देश फडणवीस यांनी दिले.
आराखड्यात निश्चित करण्यात आल्यानुसार रायगड किल्ल्याच्या महादरवाजाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. किल्ल्याच्या विकासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत एक विशेष सेल निर्माण करण्यात आला असून त्यात १ अधिक्षक अभियंता, २ कार्यकारी अभियंता, ४ उपअभियंता व त्यांच्या अधिनस्त कनिष्ठ अभियंता यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. किल्ल्याच्या पदपथाच्या १३.९८ कोटी रुपयांच्या २ कामांना भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची मंजुरी प्राप्त झाली आहे, अशी माहिती यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या पदपथाचे काम तातडीने सुरु करण्यात यावे,असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी किल्ल्यावर साऊंड आणि लाईट शो सादर करण्याचे प्रस्तावित असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाची मंजुरी घेऊन हा शो लवकरात लवकर सुरु होईल यादृष्टीने गतिमान कार्यवाही करण्यात यावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. याशिवाय किल्ल्यावर करावयाचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, पर्यटक निवास आदी कामांनाही गती देण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.
किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी निरीक्षण वाहने घेणे, किल्ल्यावर २ ठिकाणी स्वच्छतागृहांचे बांधकाम, किल्ल्यावरील बालेकिल्ला व जगदीश्वर मंदीर या महत्वाच्या वास्तुंचे दस्ताऐवज तयार करणे, जिजाऊवाडा-समाधी, पाचाड परिसरात पिण्याच्या पाणीपुरवठ्याची सुविधा निर्माण करणे आदी कामांसंदर्भात कार्यवाही सुरु असून हत्ती तलाव, कुषावर्त तलाव व गंगासागर तलाव यातील गाळ काढण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली.
रायगड किल्ल्याभोवती पर्यटकांसाठी परिक्रमा करण्याचा प्रस्ताव, राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत महाड ते रायगड या रस्त्याचे काम करण्यास मान्यता घेणे, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत परिसरातील चार रस्त्यांचे बांधकाम करणे, रोपवे यंत्रणेचे सक्षमीकरण करणे अशी विविध कामेही प्रस्तावित करण्यात आली असून ती निर्धारीत वेळेत सुरु करण्यात यावीत. पर्यटन विकासाच्या दृष्टीने रायगड किल्ला हा राज्याचा महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे. त्याच्या विकासासाठी मान्य करण्यात आलेल्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. संबंधीत सर्व विभागांनी ही कामे गतीने पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पर्यटन मंत्री रावल यावेळी म्हणाले की, राज्यातील गड, किल्ले, ऐतिहासीक वास्तु यांच्या विकासासाठी पर्यटन विभागाने महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. रायगड किल्ल्याचा सर्वांगिण विकास करुन त्याच धर्तीवर राज्यातील इतर गडकिल्ल्यांचाही विकास करण्यात येईल.