मुंबई: मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने पुढील २४ तासांत रायगड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. दरडी कोसळण्याची ठिकाणे, समुद्रकिनाऱ्या लगतच्या गावांना व मच्छीमारांना यामुळे सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने कोकणाला झोडपून काढला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क ही तुटला. हवामान खात्याने अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. या काळात समुद्राला उधाण येणार असल्याने जिल्यातील दरडग्रस्त, नदी किनाऱ्याजवळील गावांमधील नागरीकांना व मच्छिमारांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती व दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये जिवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे झाड पडणे, पाणी थांबणे, दरड कोसळणे इत्यादी आपत्कालीन परिस्थितीस समोरे जाण्यासाठी बचाव पथक, साहित्य, रुग्णवाहिका इ. सुविधा, नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावेत असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना देण्यात आले आहेत. कोणत्याही आपत्तीची सुचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षास 02141-222118/ 222097/ 222322/ 9763646326 या क्रमांकावर द्यावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत.