क्षयरोग मुक्त 376 ग्रामपंचायतींचा सत्कार
रायगड(जिमाका)दि.24:- रायगड जिल्हा क्षयरोग मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. ही अतिशय उल्लेखनीय बाब असून रायगड जिल्हा 100 टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले.
जिल्हा क्षयरोग केंद्र व जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात क्षयरोग मुक्त झालेल्या 376 ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते महात्मा गांधी यांचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मनीषा विखे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निशिकांत पाटील आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.प्राची नेहूलकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शितल जोशी, नॅशनल लीड डी. एफ.वाय,डॉ.श्वेता अरोरा, क्षयरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश राठोड उपस्थित होते.
जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, रायगड जिल्हा टीबीमुक्त करायचा असेल तर वैयक्तिक स्वच्छतेलाही महत्व दिले पाहिजे. वैयक्तिक स्वच्छता राहिली तर कुटुंब स्वच्छ राहील आणि कुटुंब चांगले राहिले तर गाव चांगले राहील. गाव चांगले राहील तरच आपला जिल्हा चांगला राहील. स्वच्छतेमुळे क्षयरोगच नाही तर इतर आजारांनाही आळा घालू शकतो. एखादी योजना यशस्वी करायची असेल तर त्या कामांमध्ये सातत्य असले पाहिजे. त्या योजनेची आपल्याला उद्दिष्ट माहीत असणे आवश्यक आहे आणि उद्दिष्ट पूर्ततेसाठी आपण मेहनत घेतली पाहिजे तरच यश मिळेल. क्षयरोग मुक्त ग्रामपंचायतींनी हे सातत्य राखावे. क्षयरोग विषयीच्या प्रचार प्रसिद्धीसाठी सोशल मिडीयाचा वापर जास्तीत जास्त करावा अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड म्हणाले की, क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्यूबर्क्युलोसिस या जिवाणूमुळे होतो. रायगड जिल्ह्यातील लोकसंख्या ही स्थलांतरित असून येथे आदिवासी भाग सर्वात जास्त आहे. तरीही आपल्या जिल्ह्याचे काम खूप चांगले आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांनी प्रयत्न केल्याने 376 ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेस फंडातून क्षयरुग्णांनी तीन महिन्याचे औषधाचे किट देण्यात येत आहेत असेही श्री.बास्टेवाड यांनी सांगितले.
प्रास्ताविकात प्रयोगशाळा पर्यवेक्षक जितेंद्र आहिरराव म्हणाले की, जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी आश्वासक पावले उचलण्यात येत आहेत. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत मागील काही दिवसात 5 लाख 17 हजार 814 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये अति जोखीम ग्रस्तभाग, वयोवृद्ध, धूम्रपान-मद्यप्राशन करणाऱ्या व्यक्ती, कुपोषित व्यक्ती व मागील पाच वर्षातील क्षयरोग बाधित रुग्ण, टीबी रुग्णाशी संपर्कातील व्यक्ती, मधुमेह बाधित व एच.आय.व्ही. बाधित व इतर जोखीमग्रस्त व्यक्तीच्या समावेश होता. 2014 या वर्षात 4 हजार 218 नवीन क्षयरुग्ण आरोग्य विभागाने शोधून काढलेले आहेत. जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींपैकी 376 ग्रामपंचायतींमध्ये एकही क्षयरुग्ण नसल्याने या ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. आभार प्रदर्शन सतीश दंतराव यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. शेवटी मान्यवरांनी टी बी हरेल देश जिंकेल अशी शपथ सर्वाना दिली. कार्यक्रमास सरपंच,ग्रामसेवक,आशा सेविका उपस्थित होत्या.