
रत्नागिरी : रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात बुधवारी दरड कोसळली होती. त्यामुळे वाहतूक पुर्णतः ठप्प होती. कोसळलेली दरड 24 तासानंतर प्रशासनाला हटवण्यात यश आलं आहे.
रत्नागिरीत दोन दिवसांपासून पडणा-या मुसळधार पावसामुळे खेडच्या रघुवीर घाटात दरड कोसळली होती. बुधवारी अकल्पे गावाजवळ ही दरड कोसळल्यानं 15 गावांचा संपर्क तुटला होता. दरड कोसळल्याने साता-याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. तब्बल 24 तास हा मार्ग बंद होता. बुधवार सायंकाळी 4 वाजता ही दरड कोसळली, मात्र या भागात पाऊस असल्यानं दरड हटवण्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते. दरड कोसळळ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु केले मात्र. पावसामुळे कामात अडथळा येत होता. अखेर 24 तासांनी दरड बाजूला करण्यात यश आलं. त्यामुळे सध्या या मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली.














