पालघर : विमानांच्या रोमांचकारी कसरतींचा थरार रविवारी बोर्डी येथे रंगला. आकाशात इलेक्ट्रिक मोटर व इंजिनच्या साहाय्याने उडणाऱ्या व रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणारी विमाने, घारीप्रमाणे हवेवर संथ तरंगणारे ग्लायडर, उडती तबकडी, हवेत खऱ्या लढाऊ विमानाप्रमाणे कोलांट्या गिरक्या मारत थरारक कसरती करणारे फायटर व हवाई पुष्पवृष्टी तसेच बॅनर उडविणारे टेली मास्टरची थरारक प्रात्यक्षिके करण्यात आली. मराठी विज्ञान परिषद बोर्डी, लिटल विग्ज इंडिया, पुणे यांनी हा एरोमॉडेलिंग शो सादर केला. त्याचा आनंद अबालवृद्धांनी लुटला.
मदनराव पांडुरंग सावे क्रीडा संकुल येथे झालेल्या या आकर्षक प्रात्यक्षिकांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कटघरा पॉलिटेक्निकचे प्राचार्य सदानंद नियोगी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माहिती व जनसंपर्कचे संचालक देवेंद्र भुजबळ, पत्रकार संघाचे अध्यक्ष संजीव जोशी, बोर्डीचे उपसंरपच सुचित सावे, मराठी विज्ञान परिषद बोर्डीच्या अध्यक्षा उर्मिला करमरकर, सदानंद काळे आदीं उपस्थित होते.
विमानाची मॉडेल्स बनविण्याचा छंद असणार्या सदानंद काळे यांनी एरोमॉडेलिंगची प्रात्याक्षिके विद्यार्थ्यांना दाखविली. विमानातील विज्ञानाचा शालेय विद्यार्थ्यांना परिचय करुन दिला. रेडिओ कंट्रोल्ड विमानांचे आकर्षक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी चार हजार विद्यार्थी उपस्थित होते. प्रत्यक्ष थर्माकोलचे विमान बनवून ते विमान हवेत उडविण्यात आले व खाली कसे उतरविण्यात येते त्याचे प्रात्याक्षिक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले.
ग्रामीण भागात एरोमॉडेलिंगची अजूनही माहिती नाही. ती माहिती व्हावी व येथील विद्यार्थ्यांना तो शो पाहता यावा, या हेतूने मराठी विज्ञान परिषद बोर्डी विभागाने हा शो घेतला. सदानंद काळे यांनी विमानातील विज्ञान विद्यार्थ्यांना सोप्या शब्दात समजावून दिले. थरारक प्रात्यक्षिके अहमदनगरचे एरोमॉडेलर्स यश जहागिरदार व त्यांच्या नऊ सदस्यांच्या ग्रुपने सादर केली.