३ हजार ४९३ भटक्या श्वानांचे करण्यात आले रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण
पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या पुढाकाराने व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने राबविली मोहीम
Mumbai : दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी जगभरात ‘रेबीज दिवस’ पाळला जातो. या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे दिनांक २८ सप्टेंबर ते दिनांक १३ ऑक्टोबर २०२१ या कालावधी दरम्यान रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा पाळण्यात आला. या अंतर्गत दररोज सकाळी ८ ते दुपारी २ या दरम्यान करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान ३ हजार ४९३ इतक्या संख्येतील भटक्या श्वानांचे लसीकरण करण्यात आले. यासाठी महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या २ चमू कार्यरत होत्या. या चमुंमध्ये महानगरपालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी आणि श्वान पकडण्याकरिता अर्ध पशुवैद्यकीय कर्मचारी (Para Veterinary Staff) यांचा समावेश होता. तर पशुवैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांचेही या कामी मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये प्रामुख्याने प्राणीप्रेमी संस्था, द वेल्फेअर ऑफ स्ट्रे डॉग्ज, उत्कर्ष ग्लोबल फाऊंडेशन, इन डिफेन्स ऑफ ऍनिमल्स, मुंबई ऍनिमल्स असोसिएशन व पेट ओनर्स व ऍनिमल लव्हर फाऊंडेशन या संस्थांचा समावेश होता. तसेच श्वान पकडण्यासाठी महानगरपालिकेच्या परिवहन खात्याद्वारे वाहने उपलब्ध करुन देण्यात आली होती, अशी माहिती महानगरपालिकेच्या पशुवैदयकीय आरोग्य खात्याचे महाव्यवस्थापक डॉ. श्री. के. ए. पठाण यांनी दिली आहे.
दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस दरवर्षी जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू हा रेबीज या रोगाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे हा आहे. त्याचबरोबर रेबीज या रोगाचा प्रतिबंध करणे आणि रेबीजचे नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या विविध स्तरीय उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करणे हा आहे. प्रसिद्ध फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच दिनांक २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. लुईस पाश्चर व त्यांच्या चमूने सर्वप्रथम रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली होती. याच अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण व जनजागृती पंधरवडा पाळण्यात आला.
या निमित्ताने महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य खात्याच्या महाव्यवस्थापकांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्या घरी पाळीव श्वान आहेत, त्यांनी आपल्या श्वानांना वर्षातून एकदा व निर्धारित दिवशी रेबीज प्रतिबंधात्मक लस ही पशुवैद्यकांकडून अवश्य देववून घ्यावी.