
डोंबिवली, (प्रशांत जोशी) : शहरात फेरीवाल्यांच्या न्याय हक्कासाठी सक्षम संघटनेचे गरज ओळखून भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी (संलग्न) राष्ट्रीय सर्व श्रमिक संघानेच्या फेरीवाल शाखेचे उद्घाटन शुक्रवारी मोठ्या थाटामाटात पार पडले. भा.ज.पा. कामगार आघाडी महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाच्या फेरीवाला विभाग (डोंबिवली) फलकाचे अनावरण केले.
पूर्वेकडील इंदिरा चौकात जाधव यांनी फलकाचे अनावरण करताच फटाक्यांची आतषबाजी करीत भारतीय जनता पार्टी झिंदाबाद, फेरीवाले संघटना झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी संघटनेचे सरचिटणीस सुरेश कोलते, कार्याध्यक्ष प्रशांत पवार, खजिनदार प्रशांत तळवडेकर, उपाध्यक्ष समीर रावराणे, अॅड. विक्रांत निंबाळकर, चिटणीस मयुरेश वाडेकर, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल आरेकर, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष ठाकूर अमिताभ गुलाब सिंह उपस्थित होते. यावेळी प्रदीप गुप्ता यांची कल्याण डोंबिवली शहर फेरीवाला विभाग अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याचे प्रमोद जाधव यांनी जाहीर केले. यावेळी जाधव म्हणाले, येथील फेरीवाले आणि श्रमिक यांना वेळोवेळी त्रासदायक ठरणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी संघटना बांधील आहे. आमच्या बांधवानीही सामाजिक बांधिलकी जपुन काम केले पाहिजे. त्यांनी आपले अस्तित्व योग्य प्रकारे निर्माण केले पाहिजे. नागरिकांनाही त्रास होता कामा नये. येथील नागरिकही आपल्या बाजूने ऊभे राहिले पाहिजे असे सामाजिक कार्य करा. कल्याण डोंबिवली शहर फेरीवाला विभाग नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप गुप्ता आणि त्यांच्या टीमला त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा. त्यांनी त्यांचे काम चांगल्या प्रकारे करावे अशी अपेक्षा करतो. तर प्रदीप गुप्ता म्हणाले, कल्याण डोंबिवली परिसरातील फेरीवाल्यांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना नक्कीच सकारात्मक काम करेल.















