नवी दिल्ली : काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरुध्दच्या लढयामध्ये घेतलेल्या विमुद्रीकरणाच्या निर्णयामुळे काही काळासाठी आर्थिक व्यवहारांमध्ये मंदी येऊ शकते. परंतु, अधिकाधिक आर्थिक व्यवहार रोकडविरहित झाल्यास अर्थव्यवस्थेतील पारदर्शकता वाढेल, असे प्रतिपादन देशाच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी देशातील नागरिकांशी संवाद साधताना केले.
जागतिक आर्थिक स्थिती आव्हानात्मक असतानाही आपली अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत आहे. २०१६-१७ च्या सहामाहीमध्ये मागील वर्षाप्रमाणेच अर्थव्यवस्थेच्या विकास दरात वृध्दी होऊन तो ७.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. आपला चलनफुगवटयाचा दरही योग्य स्थितीत आहे, असेही राष्ट्रपतींनी सांगितले.
राष्ट्रपतींनी भारत आणि परदेशात वास्तव्य करत असलेले नागरिक, सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि अंतर्गत सुरक्षा दलांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारताच्या सार्वभौत्वाच्या रक्षणासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या सर्व शूर सैनिक आणि सुरक्षा रक्षकांना श्रध्दांजली अर्पण केली.
राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे : –
* आपल्या दरडोई उत्पनात 10 पटीने वृध्दी झाली आहे. गरिबीच्या प्रमाणात दोन तृतीयांशाने घट झाली आहे. सरासरी आयुष्यमान दुपटीहून अधिक झाले आहे आणि साक्षरता दरात चार पटीने वाढ झाली आहे. आज आपण जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहोत. आपला देश खाद्य वस्तूंचा एक मोठा निर्यातक बनला आहे.
* आपल्या शिक्षण प्रणालीने नाविन्यासोबत हातमिळवणी केली पाहिजे जेणेकरुन आपला युवा वर्ग आयुष्यभर शिकण्यासाठी तयार राहील.
* शिस्त आणि विनम्रतेसोबत येणाऱ्या स्वातंत्र्याला आपण नाकारु शकत नाही, अनियंत्रित स्वच्छंदीपणा हे असभ्यतेचे लक्षण आहे, जे आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी तितकेच हानिकारक आहे.”
* आजच्या युवकांमध्ये आशा आणि आकांक्षा ओतप्रोत भरल्या आहेत. संधींच्या कमतरतेमुळे ते निराश आणि दु:खी होतात, ज्यामुळे त्यांच्या वागणुकीत, संताप, चिंता, तणाव, विचलितपणा निर्माण होतो. लाभदायक रोजगार, समाजाबरोबर सक्रीय संबंध पालकांचे मार्गदर्शन आणि जबाबदार समाजाकडून सहानुभूतिपूर्वक प्रतिसादाच्या माध्यमातून, त्यांच्यात समाजाभिमुख वृत्ती निर्माण करायला हवी.
* समाजाच्या कल्याणाला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांची रचना करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानाचा उद्देश गांधीजींच्या 150 व्या जयंतीपर्यंत2 ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताला स्वच्छ बनवणे हा आहे.
* डिजिटल आराखडयाची सार्वत्रिक तरतूद आणि रोकड विरहित आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून ज्ञानपूर्ण अर्थव्यवस्था निर्माण करत आहे. स्टार्ट-अप इंडिया आणि अटल नाविन्यता अभियानसारखे उपक्रम नाविन्यता आणि नवीन युगाच्या उद्यमशीलतेला प्रोत्साहन देत आहेत. कौशल्य भारत उपक्रमांतर्गंत, राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान 2022 पर्यंत 30 कोटी युवकांना कुशल बनवण्याचे काम करत आहे.
* आपला प्रजासत्ताक 68 व्या वर्षात प्रवेश करत असताना, आपली व्यवस्था योग्य नसल्याचे आपण स्वीकारायला हवे. त्रुटी ओळखून त्या सुधारायला हव्यात. स्थायी आत्म समाधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवे. विश्वासाचा पाया मजबूत करायला हवा. निवडणूक सुधारणांवर रचनात्मक वाद-विवाद करणे आणि स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दशकांमधील परंपरेकडे पुन्हा वळण्याची वेळ आली आहे, जेव्हा लोकसभा आणि राज्य विधान सभांच्या निवडणुका एकाचवेळी आयोजित केल्या जायच्या. राजकीय पक्षांबरोबर सल्ला-मसलत करुन हे काम पुढे नेण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे.
* काटयाची स्पर्धा असलेल्या जगात, आपण आपल्या जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल.
* आपल्या महिलांना आणि मुलांना संरक्षण आणि सुरक्षा पुरवण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करायचे आहेत. महिलांना सन्मानाने आणि आदराने जीवन जगण्यासाठी सक्षम बनवायला हवे. मुलांना त्यांचे बालपण मजेत घालवता यायला हवे.
* पर्यावरणीय आणि परिसंस्थेतील प्रदूषण वाढवणाऱ्या आपल्या उपभोगाच्या पध्दती बदलण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम करायचे आहेत. पूर, भूस्खलन आणि दुष्काळ स्वरुपातील प्रकोप रोखण्यासाठी आपल्याला निसर्गाला शांत करावे लागेल.
* दहशतवादासारख्या वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपल्याला अधिक परिश्रम केले पाहिजेत. या शक्तींचा दृढ आणि निर्णायक पध्दतीने सामना केला पाहिजे. आपल्या विरोधात असणाऱ्या या शक्तींचा विस्तार रोखला पाहिजे. आंतरिक आणि बाहय धोक्यांपासून आपले संरक्षण करणाऱ्या आपल्या सैनिक आणि सुरक्षा रक्षकांच्या कल्याणाची आपण खात्री दिली पाहिजे.
* आपल्याला अजून परिश्रम करायचे आहे. कारण, आपण सर्व आपल्या आईची समान मुले आहोत आणि आपली मातृभूमी आपल्या प्रत्येकाला मग आपण कोणतीही भूमिका बजावत असलो तरीही, आपल्या संविधानातील मूल्यांनुसार, निष्ठा, समर्पण आणि खरेपणासह आपले कर्तव्य बजावायला सांगते.