मुंबई : देशाला स्वास्थ्य, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी योगाभ्यास महत्वाचा आहे. म्हणून प्रत्येकाने योग साधना करावी, असे केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले. ते आज मुंबईत एस एन डी टी महाविद्यालयात पाटकर हॉलमध्ये तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग साधना कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस एन डी टी चे प्रमुख डॉ. शशीकला वंजारी होत्या.
आठवले पुढे म्हणाले की, भारतात गेल्या अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी विपश्यनाच्या साधनेतून योगरुपी ध्यान साधना विकसित केली. देशात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सुद्धा योगसाधना महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रस्तावित एस एन डी टी चे रजिस्टार डॉ. एस.एन.भारंबे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपण भाषणात एस एन डी टी विद्यापीठाचा ओझरता आढावा त्यांनी घेतला. तसेच योगाचे महत्व पटवून सांगितले. विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. शशीकला वंजारी यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमात कैवल्यधाम फाऊंडेशनचे योग शिक्षक संदीप सोळंकी यांनी योगाचे प्रात्यक्षिक उपस्थितांकडून करुन घेतले. या कार्यक्रमात कैवल्यधामचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांच्यासह एस एन डी टी विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.