मुंबई : कोव्हीड-१९ लॉकडाऊनमुळे राज्यातील पदवी व पदव्युत्तर विभागाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने राज्य सरकारकडे केली आहे.
लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी देखील अडचणीत सापडले आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर सर्व प्राध्यापक, इतर कर्मचारी, विद्यापीठातील सर्व प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना नियोजन करण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. तसेच राज्यातील बऱ्याच विद्यापीठातील अनेक विभागाचे अभ्यासक्रम शिकवण्याचे अजून राहिलेले आहे. म्हणून लॉकडाऊन हटवल्यानंतर लगेच परीक्षा घेऊ नयेत, असे एसएफआयचे म्हणणे आहे.
लगेच परीक्षा न घेता विनाअट सर्व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात यावा. तसेच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर किमान एका महिन्याने या शैक्षणिक सत्राच्या परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. अंतिम वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आगामी शैक्षणिक वर्षात झाल्यानंतर लगेच त्यांचे निकाल देऊन त्यांना पुढील शिक्षणास प्रवेश देण्यात यावे, अशी मागणीही एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटीने केली आहे,
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगभरासह देशात आणि राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार सर्वोत्तपरी प्रयत्न करतच आहे; परंतु या महामारीला आटोक्यात आणण्याचे खूप मोठे आव्हान आपल्या समोर आहे. अशा परिस्थितीत अनेक कामगारांचे काम हातातून निसटले आहे. अनेकांना कामे सोडून गावी परतावे लागले आहे. अनेक कुटुंबे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करीत आहेत. याचा परिणाम विद्यार्थी वर्गावर देखील तितकाच झालेला आहे. म्हणून एसएफआय महाराष्ट्र राज्य कमिटी राज्य सरकारला सूचना व मागण्या करीत असल्याचे राज्य अध्यक्ष बालाजी कलेटवाड, राज्य सचिव रोहिदास जाधव यांनी सांगितले.