मुंबई, 5 मे : राज्यात संपूर्ण दारूबंदी करा, अशी मागणी सिटू या कामगार संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने कंटेनमेंट एरिया वगळून इतर भागात दारू विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र मध्ये विविध शहरांमध्ये दारू दुकाने सुरू करून दारू विक्री करण्यात आली. त्यामुळे अनेक शहरामध्ये दारू दुकाना समोर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली. नाशिक सारख्या ठिकाणी ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यामुळे शारीरिक अंतर ठेवण्याचं निर्णयाला हरताळ फासला जात आहे, असे सिटूने म्हटले आहे.
दारू विक्री सुरू झाल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि फैलाव होत असताना दारुड्यांकडून समाजातील इतर घटकांना व कुटुंबातील महिलांना त्रास होण्याची मोठ्या शक्यता आहे. त्यामुळे अनेक गुन्हे ही होऊ शकतात. महसूल मिळवण्याच्या हव्यासापोटी दारू विक्री सुरू करण्याचा निर्णय हा आत्मघातीपणे घेतला आहे. आज सबंध महाराष्ट्रातील परिस्थिती लक्षात घेता दारू विक्री सुरू ठेवणे विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व समाजासाठी हिताचे नाही, असे संघटनेकडून सांगण्यात आले.
तातडीने पूर्ण राज्यामध्ये दारू बंदी करण्याचा निर्णय करावा व सर्व दुकानातून होणारी दारू विक्री बंद करावी. याबाबत तातडीने आदेश करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सिटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड व राज्य सरचिटणीस एम एच शेख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.