वाशिम, दि. २ : राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात राबविलेले जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींसारख्या उपाययोजनांमुळे शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून उणे असलेला कृषी विकासदर यंदा १२ टक्के झाला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे विश्वशांती लक्षचंडी महायज्ञाला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री आज पोहरादेवी येथे आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, मनोहर नाईक, हरिभाऊ राठोड, पोहरादेवी संस्थानचे प्रमुख रामराव महाराज, माजी आमदार अनंतराव पाटील, अमरावती परिक्षेत्राचे पोलीस विशेष महानिरीक्षक विठ्ठल जाधव,जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामराव महाराज यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारने गेल्या दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना सिंचन सुविधा पुरविण्यावर विशेष भर दिला आहे. तसेच कृषी पंपांच्या प्रलंबित वीज जोडण्या तातडीने देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आगामी काळात कृषी पंपासाठी मागेल त्याला तातडीने वीज उपलब्ध करून देण्यात येईल. वाशिम जिल्ह्यातही जलयुक्त शिवार अभियान व सिंचन विहिरींचे काम सुरु आहे.
देशभरातील बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवीचा विकास करण्यासाठी ७३ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या माध्यमातून बंजारा समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. विकास आराखड्याची कामे विहित कालावधीत पूर्ण करण्यात येतील. या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सुरुवात बंजारा भाषेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीला पोहरादेवी येथे जमलेल्या बंजारा समाज बांधवांना त्यांच्या बोली भाषेतून साद घातली. गेल्या दोन वर्षांपासून पोहरादेवी येथील यात्रेला येण्याची इच्छा होती, आज ही इच्छा पूर्ण झाल्याने आनंद होत असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी बंजारा भाषेतून व्यक्त करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.
पोहरादेवी हे कष्टकऱ्यांचे श्रद्धास्थान – पंकजा मुंडे
पोहरादेवी हे देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेचे श्रद्धास्थान आहे. माझे वडील स्व. गोपीनाथराव मुंडे यांचेही हे श्रद्धास्थान असल्याने त्यांची परंपरा कायम ठेवणार असून यापुढेही प्रत्येकवर्षी आपण पोहरादेवी येथे येणार असल्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. बंजारा आणि वंजारी यांचे सांस्कृतिक ऋणानुबंध प्राचीन असल्याचे सांगून त्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये शासनाने जो विकास केला, तो यापूर्वी कधीच झाला नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी आहे. अशा या पवित्र धार्मिकस्थळी जो यज्ञ सुरु आहे, त्या यज्ञामध्ये आपले अहंकार, व्यसन आणि भ्रष्टाचार याची आहुती देण्याचे आवाहन श्रीमती मुंडे यांनी केले.