नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबईतील माता भगिनींना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करुन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे, जेणेकरुन स्त्रियांच्या बाबतीत समाजात घडणाऱ्या हिंसक घटनांवर मात करता येईल, हाच राजमुद्रा महिला संघटना स्थापण्यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन श्री काळभैरव मंडळ मुंबईचे अध्यक्ष रुपेश पाटील यांनी केले.
श्री गणेश मंदिर हॉल, जुईनगर येथे नुकताच संघटनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. वारळ गाव, श्री काळभैरव मधली आळी मंडळ मुंबई हे या कार्यक्रमाचे व्यवस्थापक होते. सचिव प्रशांत माळी, खजिनदार किसन धुमाळ, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपसचिव मनोहर धुमाळ,सल्लागार अनंत चाळके, मार्गदर्शक- चंद्रकांत धुमाळ, कुमार धुमाळ, हिशोब तपासनीस यशवंत चाळके,राजेश पाटील आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रकाश माळी, अशोक धुमाळ, संतोष पाटील आदीचे मार्गदर्शन कार्यक्रमाला लाभले. यावेळी जिल्हाध्यक्षा माधुरीताई सुतार यांनी महिलांना संघटनेविषयी मार्गदर्शन केले.
महिलांवर होणारे अत्याचार, शोषण रोखण्यासाठी काढलेल्या या संघटनेची मुक्त कंठाने महापौरांनी प्रशंसा केली. उपस्थित महिलांनी या संघटना स्थापनेबरोबरच नवी मुंबई महापालिकेची स्वच्छता अभियान ही संकल्पना उचलून धरत आमचे हे नवी मुंबई शहर भारतात अव्वल कसे येईल याची दक्षता घेऊ अशी ग्वाही महापौरांसमोर दिली.
या कार्यक्रमात माता भगिनींच्या या संघटनेला पाठिंबा आणि शुभेच्छा देण्यासाठी पुरुष वर्गही तितक्याच संख्येने उपस्थित होता, हे या समारंभाचे वैशिष्ट्य होते. श्री काळभैरव मंडळ मुंबईच्या सभासदांनी आपल्या कुटुंबातील महिलांना, माता-भगिनींना एकत्र करुन त्यांना त्यांची स्वतःची संघटना काढण्यासाठी मदत केली आहे.