मुंबई : राजापूर (जि. रत्नागिरी) शहराची भविष्यातील पुढील ३० वर्षांची अंदाजित लोकसंख्येची पाण्याची गरज लक्षात घेऊन सुयोग्य ठिकाणी धरण बांधण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना रत्नागिरी येथील जिल्हाधिका-यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत दिली.
राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटीशकालीन धरणाबाबतची लक्षवेधी सदस्य हुस्नबानो खलिफे यांनी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री श् फडणवीस म्हणाले की, राजापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ब्रिटीशकालीन धरणाचे संरचनात्मक परीक्षण सांगली येथील वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्याकडून करुन त्याबाबत अहवाल सादर केलेला आहे. या धरणास भविष्यात धोका निर्माण झाल्यास त्यापासून जिवीत हानी होण्याची शक्यता कमी आहे. याठिकाणी नवीन मातीचे धरण बांधणे आवश्यक असून यासाठी अंदाजे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याकरिता १५ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले