रत्नागिरी, (आरकेजी) : कोकणातील धार्मिक स्थळ असणार्या राजापूर तालुक्यातील उन्हाळे गावातल्या कुंडामध्ये पाण्याचा प्रवाह वाहण्यास रविवारी सुरुवात झाली आहे. या कुंडांमध्ये गंगा प्रकटते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
यापूर्वी दर तीन वर्षांनी गंगेचे आगमन येथे होत असे. सन २०१२ पासून दरवर्षी आगमन होत आहे. या आधी ३१ जुलै २०१६ रोजी गंगा येथे अवतरली होती, त्यावेळी तीन महीने येथे पाणी होते. गंगा अनेकांचे श्रद्धास्थान असल्याने; प्रकटल्याची माहिती कळताच भाविकांनी दर्शनासाठी येथे येण्यास सुरुवात केली आहे.
उन्हाळे गावातल्या १४ कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. गो मुखातून हे पाणी येत आहे. १० नद्यांचं पाणी इथल्या गंगा कुंडात येते, असे बोलले जाते.
गंगा गेल्यानंतर या ठिकाणी इथल्या कुंडात पाण्य़ाचा एक थेंब ही पहायला मिळत नाही. तर गंगा आली कि इथल्या प्रत्येक कुंडात पाणी साठते. मुसळधार पाऊस असला तरी हि कुंड कधीच भरुन वहात नाही. तर कितीही उन्हाळा असला तरी इथल्या १४ कुंडात पाणी असतेच असते.
दरम्यान, उन्हाळे गाव मुंबई गोवा महामार्गावर आहे. त्यामुळे प्रकट झालेल्या गंगेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे.