मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचार सभा उद्या(ता. १४) विक्रोळीतील कन्नमवार नगर नंबर २ येथे होत आहे. सायंकाळी सहा वाजता इमारत क्रमांक १३८ समोर सभा होणार आहे. सभेची जय्यत तयारी मनसैनिकांनी केली आहे. कन्नमवार नगरात राहणारे मनसेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार मंगेश सांगळे यांनी ऐन निवडणुकीत भाजपात प्रवेश केला. महत्वाचे म्हणजे या प्रभागात मनसेचा नगरसेवक आहे. यामुळे राज यांच्या सभेला विशेष महत्व आले आहे.
या आधी मंगेश सांगळे यांना निवडून आणण्यासाठी राज यांनी येथे सभा घेतली होती. आता सांगळे हे भाजपाकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे राज हे सांगळे यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.
राज यांची प्रचार सभा पूर्व उपनगरातील प्रभागांमध्ये निवडणूक लढविणार्या उमेदवारांसाठी असणार आहे. सभेसाठी पंधरा हजार नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यास मनसेला फायदा होऊ शकतो, त्या दृष्टीने कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. सोशल मिडियातूनही राज यांच्या सभेचे ठिकाण आणि वेळ यांचे निमंत्रण मनसेकडून दिले जात आहे.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि विनोद तावडेंही कन्नमवार नगरात
राज ठाकरे यांची सभा उद्या कन्नमवार नगरात होत आहे. याचवेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि राज्याचे मंत्री व भाजपा नेते विनोद तावडे हे ही येथे सायंकाळी सभा घेत आहेत. आदित्य यांची सभा जनता मार्केटमध्ये होत आहे. राज यांच्या सभेच्या प्रचारापासून आदित्य यांची सभा हाकेच्या अंतरावर होईल. परंतु, मनसेच्या सभेनंतर आदित्य यांची सभा होईल. विनोद तावडे यांची सभा बाल गंधर्व मैदानात होणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि मनसेचे कार्यकर्ते विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, नाहूर येथे मोठ्या प्रमाणावर राहतात. त्यामुळे सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.