मुंबई : दोन कोंबडे इतक्या दिवसांपासून झुंजत असल्याचे मी पाहत आहे, त्यांचे सारखे तेच तेच सुरू आहे. यांच्या भांडणांशी मुंबईकरांचा काहीही संबंध नाही, परंतु, लोकांची मात्र भरपूर करमणूक होत आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रोज रंगणार्या कलगीतुर्याचा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खरपूर समाचार घेतला. विक्रोळी येथील कन्नमवार नगरातून राज यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवसेना-भाजपा, नोटाबंदीमुळे कोलमडलेली समाजव्यवस्था, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आदी विषयांवर ठाकरी भाषेत टीका केली. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादात राज यांची सभा पार पडली.
मुलगा आजारी होता, त्यामुळे प्रचारसभा घ्यायला उशीर झाला, असे राज यांनी स्पष्ट केले. मी मैदानात नसताना मनसेचे नेते आणि उमेदवार उत्तमरित्या प्रचार करीत आहेत, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. संकटे येतात तेव्हा चारही बाजूने येत असतात, त्यावर मात करत पुढे जावा, असे त्यांनी मंनसैनिकांना संगितले. निवडणुकीच्या मैदानात आजपासून उतरलो आहे, असे राज यांनी विरोधकांना ऐकवले. पूर्व उपनगरातील मनसेचे उमेदवार यावेळी मंचावर उपस्थित होते.
मोदींनी केलेल्या नोटाबंदीची झळ सामान्य माणसांना बसत आहे. यांना मोदींनी रांगेत उभे केले. तसेच कोट्यवधी लोक बेरोजगार झाले. आतापर्यंत दोनशे माणसे मरण पावले आहेत. नोटाबंदी का केली? आज ही पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत. पाकिस्तानात दोन हजारच्या खोट्या नोटा छापल्या जात आहेत आणि त्या भारतात आणल्या जात आहे. मोदी म्हणाले होते नवीन भारत दिसेल, मला कुठेच दिसला नाही. अश्या भूल थापांमुळे देश पारतंत्र्यात राहिला, असे म्हणत राज यांनी नोटाबंदीचा समाचार घेतला. कॅशलेस भारतावर देखील राज यांनी कठोर शब्दात टीका केली. देशात पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत. येथे कॅश देऊनच व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे रोकडरहित अर्थव्यवस्था कुठे आहे, असे ते म्हणाले.
नाशिकमध्ये मागील पाच वर्षांत केलेला विकास पाहा. नाशिक पालिकेला दोन वर्ष आयुक्तच दिला गेला नाही, तरी मनसेने कारभार केला. आज नाशिकचा पाणीप्रश्न सुटला आहे. तेथे पुढची चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करून ठेवली आहे, अशी माहिती राज यांनी दिली.
मुंबईत मराठी शाळा बंद होत आहेत. तर उर्दू शाळा वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत कोण येत आहेत, तेच समजत नाही, याकडे राज यानी लक्ष वेधले. शिवसेनेची ही पाचवी महानगरपालिकेची निवडणूक आहे. यांना पारदर्शी कारभाराचे सर्टिफिकेट कोणी दिले हे माहीत नाही. रस्ता बनविल्यावर खड्डे बुजविण्याचे कंत्राट काढणारी मुंबई पालिका एकमेव आहे, असे म्हणत त्यांनी शिवसेनेच्या कारभारावर टीका केली.
शिवाजी पार्क येथील महापौर बंगला बाळासाहेबांच्या नावाने हडपण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महापौरांची व्यवस्था राणीच्या बागेत केली जाणार आहे ? त्या बागेत एकमेव प्राणी हा गजाआड झालेला महापौर असेल, असे राज यांनी म्हणताच सभेत एकच हशा पिकला.
उद्योगपतींनी नाशिकमध्ये निधी खर्च केला. इथे नाही केला कारण सीएसआर फंडातून कंपन्या भ्रष्टाचार होऊ देत नाहीत म्हणून इथे काम केले नाही. मला ब्लु प्रिंट बद्द्दल विचारले जाते, ब्लु प्रिंट दाखवल्यावर कधीच पुढे काही बोलले गेले नाही. शिवसेनेने टॅब वाटले ते लगेच बंद पडले. कोट्यावधीचा भ्रष्टाचार यात झाला, या बाबत त्यांना कोणीच काही विचारत नाही, अशी खंत राज यांनी बोलून दाखविली.
मुंबईत मोकळ्या जागा आहेत. येथील नगरसेवकांनी तेथे क्लब बनविले आहेत. पैसे कमविण्याचे काम तेथे जोरात सुरू आहे. नाशिक सारखी उद्याने मुंबईत आहेत का? भाजप कोणत्या तोंडाने भ्रष्टाचाराचे आरोप करतात. भाजपही सत्तेत होती. त्यांचे ही हात या भ्रष्टाचाराला लागले आहेत, असे राज म्हणाले.
इतर पक्षातून माणसे फोडण्यासाठी भाजपा पैसा खर्च करत आहेत. बावन्न वर्ष झाली तरी यांना उमेदवार मिळत नाहीत, असे म्हणत राज यांनी भाजपवर प्रहार केले. भाजपा फक्त आश्वासन देते. त्या पलीकडे काही करत नाही, असेही ते म्हणाले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी मी साडे सहा हजार कोटी देईन, अशी वल्गना मुख्यमंत्र्यांनी केली होती. साडे सहा रुपये तरी दिले का? भाजपा केवळ भुलथापा देत आहे. त्याला बळी पडू नका, असे राज यांनी सांगितले.
मुंबईच्या विकाससाठी मनसेला मतदान करण्याचे आवाहन राज यांनी केले.