मुंबई : ईद -अल-अजा किंवा बकरी ईदच्या कुर्बानीची रक्कम बकरीची कुर्बानी न करता केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी द्या, असे आवाहन मुस्लिम समाजातील तरुणांनी केले आहे. समाजबांधवांशी चर्चा करत त्यांना कुर्बानी (त्यागा)चे महत्व समजावून ईदसाठी होणाऱ्या खर्चातून काही रक्कम केरळमधील आपल्या देशबांधवांना संकटाच्या काळात मदत करूया असे आवाहन केले आहे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मालवणीसारख्या संवेदनशील आणि मागासलेल्या वस्तीतून काही तरुण पुढे आले आहेत. पूरपरिस्थितीमुळे रेल्वे व रस्ते वाहतूक बंद असताना देखील राष्ट्र सेवा दल, केरळचे साथी मदत छावण्यांमधे जाऊन करत असलेल्या मदतीत आपणही आपला खारीचा वाटा उचलावा, तसेच बकरी ईदच्या कुर्बानीची रक्कम बाजूला काढून ती केरळमधील पूरग्रस्तांना द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे. बकरी ईद तीन दिवस साजरी केली जात असल्याने या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा या तरुणांनी व्यक्त केली. निसार अली सय्यद, वैशाली सय्यद, फिरोज अन्सारी, अफरोज अन्सारी, अफझल शेख, जाफर शेख, नासिर सय्यद, रुबिना खान, अरिफा शेख, मुश्ताक शेख, इशा सय्यद यांनी याकामी पुढाकार घेतला आहे.
आपण आपली मदत राष्ट्र सेवा दलाच्या बँक खात्यात भरु शकता
A/c no बैंक ऑफ महाराष्ट्र 20057016936
राष्ट्र सेवा दल पुणे
Ifsc:- MAHB0000041
खात्यात रक्कम जमा झाल्यावर निसार अली सय्यद,मुंबई – 9967518107 या नंबरवर कळवावे ही विनंती करण्यात आली आहे.
“संकटात सापडलेल्या केरळातील नागरिकांना मदत करण्यासाठी काही रक्कम देणे हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. आम्ही दोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यातील मान व खटाव या दुष्काळग्रस्त भागात जाऊन सिनेकलाकार सयाजीराव शिंदे यांच्या कार्यात आर्थिक मदत केली होती. त्यावेळी ही बकरी ईद साजरी न करता ती रक्कम दुष्काळग्रस्तांच्या मदतीला दिली होती, असे सामाजिक कार्यकर्त्या वैशाली सय्यद यांनी सांगितले.