मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरात राहणारा पृथ्वीक प्रताप हा गुणी कलाकार महाराष्ट्राची हास्यजत्रा या प्रसिद्ध कार्यक्रमाचा विजेता ठरला आहे. शितल कुलकर्णीच्या सहाय्याने त्याने जेतेपद पटकावले आहे. हा कार्यक्रम सोनी मराठी या वाहिनीवरून प्रसारित होत होता.
खडतर परिस्थितीवर मात करत पृथ्वीकने मारलेली ही मजल कलाक्षेत्रात येण्यासाठी धडपडणाऱ्या तरुण तरुणींसाठी प्रेरणादायी ठरली आहे. लहानपणी वडिलांचे छत्र हरवले. मामाने आधार दिला. आईने मेहनत करून पालनपोषण केले. मोठया भावानेही नाटकात काम करण्याचे करिअर घरासाठी बाजूला ठेवले. परंतु, पृथ्वीकने कोणाचीही मेहनत वाया जाऊ दिली नाही. घरच्यांच्या पाठींब्यावर आणि स्वकर्तुत्वावर आज अभिनेता म्हणून तो नावारूपास आला आहे
कन्नमवार नगरातील उत्कर्ष बालमंदिर येथे शालेय शिक्षण झाले. विकास ज्युनिअर कॉलेजमध्ये 11 वी व 12 वीचे शिक्षण झाल्यानंतर कीर्ती महाविद्यालय इथे बीएमएमचे शिक्षण घेतले.या महाविद्यालयात त्याला नाटकात काम करण्याची संधी मिळली. राज्यस्तरीय नाटकांपासून कामगार कला केंद्रातर्फे राबविण्यात जाणाऱ्या नाटकात अभिनय करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला घरातून विरोध झाला. परंतु नाटकात मिळणारे यश पाहता विरोध मावळला. मोहन प्यारे या लोकप्रिय मालिकेत काम मिळाले. संधी मिळणे सुरू झाले. युट्युब वर बेक बेंचर नावाची त्याची वेबसिरीजही खूप गाजली.
कीर्ती महाविद्यालयात नाटकात काम करण्याची सुरवात झाली असली तरी विकास महाविद्यालयात पथनाट्य शिकलो, असे पृथ्वीक म्हणतो.
अनेक वाईट घटना घडल्या. पण मी डगमगलो नाही.
भविष्यात होतकरू मुलांसाठी नाट्यशिक्षण देणारी संस्था खोलायची आहे. अभिनय ही शिकण्याची गरज नसते. आपण लहानपणापासून आपल्या रोजच्या आयुष्यात अभिनय करत असतो. फक्त मार्ग कळायला हवा, असेही तो म्हणाला.
सहकलाकार शीतल कुलकर्णीची साथ होती. तिने आणि मी केलेले सादरीकरण रसिकांना आवडले. त्यामुळे विजेता ठरलो. कलाकार म्हणून सर्व प्रकारचे अभिनय करायचे आहेत, असे पृथ्वीकने सांगितले.