सातारा : थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव यापूर्वी स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जायचे. आता पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाणार असून भिलार वासियांनी यानिमित्ताने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आपली आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. तथापि, वाचन संस्कृती रुजविण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी याठिकाणी येऊन कार्यक्रम घडवून आणावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भारतातील पहिल्या पुस्तकाच्या गावाचे उद्घाटन गुरूवारी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पशु संवर्धन, दुग्ध विकास व मस्त्य विकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, सभापती रुपाली रासपुरे, सरपंच वंदना भिलारे, बाळासाहेब भिलारे, विक्रम पावसकर, अतुल भोसले आदी उपस्थित होते.
देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळी-वेगळी सुंदर संकल्पना राबवून ती कार्यान्वित केल्याबद्दल मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे व भिलार गावच्या ग्रामस्थांचे अभिनंदन करून मुख्यमंत्री म्हणाले, भिलारने देशात या निमित्ताने वेगळा इतिहास रचला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचन संस्कृती कमी होते की काय? अशी भीती व्यक्त होत असताना, भिलार वासियांनी “नाही.. आपल्याला वाचन संस्कृती ही पूर्वजाने दिलेली आहे. ती कमी होऊ देणार नाही” असा संदेश यानिमित्ताने दिला आहे. आज गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळीने गाव सजले आहे. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद व्यक्त केला.
या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्हा घरी धन, शब्दाचीच रत्ने’ याचा प्रत्यय या गावातल्या लोकांनी आपल्या कृतीतून दाखविला आहे. याठिकाणी येणाऱ्यांसाठी यापुढे स्ट्रॉबेरीची चव व वाचनाची भूक भागविण्याची नामी संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात वाचन संकृती नवीन नाही. मराठी ही भाषा समृद्ध आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही राहिलेले आहे. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेवर जेवढी चर्चा होते तेवढी चर्चा अन्य भाषेवर होत नसावी, असे स्पष्ट करून ते पुढे म्हणाले, मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलारवासियांनी नवीन पाऊल टाकत असताना इतिहास देखील रचलेला आहे. महाबळेश्वर व पाचगणीला येणारा पर्यटक भिलारला भेट दिल्याशिवाय जाणार नाही. एवढं कर्तृत्व या गावाने करून दाखविले आहे. साहित्यातून ज्ञानाची कक्षा रुंदावत असते. वाचन केल्याने माणूस प्रगल्भ बनतो. आपल्या देशात स्वातंत्र्याच्या काळात साहित्याने मोठी भूमिका बजावलेली आहे. तसेच जगात जेवढ्या राज्यक्रांती झाल्या, त्यातही साहित्याचे मोठे योगदान आहे. आपण डिजिटल जगात वावरत असलो तरी वाचनाची सवय मात्र कमी होत नसते. ज्ञान वाचनातून मिळते, कीर्तनातूनही मिळते. त्यामुळे साहित्य संस्कृतीही संपू शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
आपण खूप काही करतो पण डॉक्युमेंटेशनमध्ये कमी पडतो. तेव्हा यापुढे यादृष्टीने देखील आपण प्रयत्न करावे, अशी अपेक्षा व्यक्त करून, वाचन संस्कृती जपून ठेवल्यास येणाऱ्या पिढीसाठी ते पोषक असणार आहे. पुस्तकाच्या भिलार या गावात सर्वच प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यामुळे पर्यटकांना निखळ आनंद मिळेल आणि जाताना तो काहीतरी ठेवा घेऊन जात आहे. अशी त्याची भावना होईल, अभिरुची वाढावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे, जेणेकरून भिलारसारख्या अन्य गावांनाही प्रेरणा मिळेल. यापुढे साहित्यिक व प्रकाशकांनी याठिकाणी येऊन प्रकाशन समारंभ घ्यावा, मी सुद्धा त्या कार्यक्रमाला निश्चित येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
तावडे यांनी पुस्तकाचे गाव भिलार याविषयी आपल्या संकल्पना विषद करताना म्हणाले, परदेशात अशा प्रकारची संकल्पना रुजू शकते तर आपल्या देशात का नाही? या जाणीवेतून हे विचार पुढे आले. भिलार गावचे सरपंच आणि ग्रामस्थ यांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे पुस्तकाचे गाव ही संकल्पना साकार झाली. या गावाच्या परिसरात महाबळेश्वर व पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण आहे. याचा लाभ पर्यटकांना निश्चितच होईल, या जाणीवेतून या गावाची निवड केली. भविष्यात भिलारसारखे अन्य गावेही पुढे यावेत, असे आमचे प्रयत्न असणार आहेत. याठिकाणी देश-विदेशातील साहित्य देखील उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. महाराष्ट्रातील मुलांची सृजनशीलता वाढावी यासाठी सहलीचे नियोजनदेखील केले जाईल. मुलं या गावात येतील. इथली साहित्य व संस्कृती सोबत घेऊन जातील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आता स्ट्रॉबेरीबरोबरही पुस्तकेही या गावात राहील. येणाऱ्या पर्यटकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या उत्साहाबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
गगराणी यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात अशा प्रकारचा उपक्रम हा देशातील पहिला आहे. मराठी साहित्य आणि मराठी माणसं याचं अतूट अस नात आहे. भविष्यात अन्य गावही भिलारच अनुकरण करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे यांनी आपल्या भाषणात स्ट्रॉबेरीची ओळख असणारे भिलार आता पुस्तकाचं गाव म्हणून नावलौकिक मिळवणार आहे. याचा आम्हाला अत्यंत आनंद होत असून, आता आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. यापुढेही परिसराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करू, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाले. याशिवाय ‘पुस्तकाच गाव भिलार’ यावर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासियांनी दाखविलेल्या औदार्याची माहिती मिळते. प्रारंभी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. आजचा कार्यक्रम आगळावेगळा असल्याने साहित्यिक व रसिक मोठ्या संख्येने आले होते. सूत्रसंचालन अनंत खासबारदार यांनी केले.