आजपर्यंत मदत न पोहचलेल्या पुरग्रस्तांपर्यंत पोहचतेय मदतरत्नागिरी, प्रतिनिधी : चिपळूणमध्ये महापूर ओसरल्यानंतर येथे मदतीचा ओघ सुरू झाला आहे. पूरग्रस्त चिपळूणच्या मदतीसाठी अनेक संस्था व राजकीय पक्ष सरसावले आहेत. सुरुवातीला मदत वाटपात सुसूत्रता नसल्याने अनेक गरजूपर्यंत ही मदत पोहचत नव्हती. शहराच्या काही भागातील चिखल हा 8 दिवस झाले तरी निघत नव्हता, त्यामुळे तिथपर्यंत मदत पोहचण्यासाठी अडचणी येत होत्या. दरम्यान आता पूरपरिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ज्या ठिकाणी मदत पोहचली नव्हती आशा भागातही मदत पोहचत आहे.
दरम्यान पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आता मनसेनं पुढाकार घेतला आहे. ज्या भागात मदत पोहोचलीच नाही त्या भागातलं नियोजन करुन आता मनसे तसेच मातोश्री ट्रस्ट पुरग्रस्तांना मदतीचा हात देत आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते औषधांपर्यंत सर्व मदत मनसे तसेच मातोश्री ट्रस्टच्या माध्यमातून केली जात आहे. चिपळूणमधील मुरादपूर, मजरेकाशी तसेच खेर्डी या भागात मदत वाटप करण्यासाठी मनसेकडून टीम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबईतील अनेक पदाधिकारी थेट पूरग्रस्त भागात मदतीसाठी धाऊन आले आहेत.आज अशाच पद्धतीनं मदत न पोहोचलेल्या मुरादपूर भागात गरजूंना गँस शेगड्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळी अरविद मालाडकर तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.















