Mumbai ” कोविड प्रतिबंध लसीचा मुंबईत उपलब्ध असलेला साठा आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) जवळपास संपुष्टात आला आहे. या कारणाने उद्या गुरुवार, दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील ७३ पैकी ४० खासगी लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. तर उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही मर्यादीत लससाठी उपलब्ध आहे. या कारणाने तेथे दुसऱया मात्रेसाठी (डोस) येणाऱया नागरिकांना प्राधान्याने व लससाठा असेपर्यंतच लस देण्यात येणार आहे.
दरम्यान, आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा प्राप्त झाल्यास उद्या गुरुवार दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे.
लससाठ्याच्या उपलब्धतेची ही वस्तुस्थिती पाहता, उद्या गुरुवार, दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी दुसरी मात्रा घेण्यास पात्र असणाऱयांनीच लसीकरणासाठी यावे, असे विनम्र आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून करण्यात येत आहे. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल, अशी अपेक्षा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरी मात्रा (डोस) घेणाऱयांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.
मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडीतपणे सुरु ठेवता यावी, त्यासाठी आवश्यक लससाठा उपलब्ध व्हावा, याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. या अनुषंगाने, आज (दिनांक २८ एप्रिल २०२१) रात्री उशिरापर्यंत सरकारकडून काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आज रात्री उशिरापर्यंत लस साठा उपलब्ध झाला तर उद्या (दिनांक २९ एप्रिल २०२१) सकाळी लससाठा वितरण करण्यात येईल. त्यानंतर महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरु करण्यास उशीर होवू शकतो.
बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिनांक २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लससाठा आज (दिनांक २८ एप्रिल २०२१ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत) लसीकरणानंतर संबधित केंद्रावर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा आजच पूर्णतः उपयोगात येण्याची शक्यता आहे.
लस उपलब्धतेबाबतची सद्यस्थिती लक्षात घेता, सर्व संबंधितांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.