डोंबिवली : दोन दिवसांपूर्वी शहरात झालेल्या मुसळधार पावसाने खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल झाले असून त्यांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. डोंबिवली रिंगरूट म्हणून आराखड्यात असणारा संपूर्ण परिसर पुराने व्यापला होता. त्यात बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने खाडी किनारी भागात मोठया प्रमाणात पूरसदृष्य परिस्थती निर्माण झाली. बफर्स झोन व सी.आर.झेड नियमांचे उल्लंघन करुन बांधण्यात आलेल्या बैठ्या चाळीमध्ये कमरेइतके पाणी शिरले आणि घरातील संपूर्ण सामान भिजून गेले. परंतु जीव वाचवण्यासाठी नागरिकांना अंगावरच्या कपड्यावर बाहेर पडावे लागल्याने हजारो डोंबिवलीकर रस्त्यावर आले आहेत.
डोंबिवलीत खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या. बाजार भावापेक्षा कमी किंमत आणि सामान्य कुटुंबाला परवडतील अशा किमतीत मिळाल्याने मध्यम वर्गीयांनी त्या खरेदी केल्या. खाडी किनारी असलेल्या नवीन देवीचा पाडा, जगदंबा मंदिर, गरीबाचा वाडा, सरोवर नगर, आयरे, भोपर, जुनी डोंबिवली, कुंबारखान पाडा, गणेशनगर ठाकूरवाडी आदी विविध ठिकाणी बाधकाम व्यावसायिकांनी मोठया प्रमाणात चाळी बांधण्यात आल्या आहेत. पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे घरातील फर्निचर, टी.व्ही., गाद्या, कपडे, धान्य सर्व भिजून खराब झाल्याने नागरिकांनी सर्व सामान बाहेर टाकून दिले. सध्या जरी पाणी ओसरले असले तरी घरात चिखल झाला आहे त्यामुळे आता रहायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेने शाळातून सोय केली असली तरी ही सोय अपूर्ण पडत आहे. पूर्वी निवडणुकीच्या हंगामात मतदार म्हणून त्यांच्याकडे पहिले जात होते आणि त्यांची विचारपूस करण्यात येत होती परंतु तशी काळजी यावेळी घेण्यात येत नाही अशी तक्रार पुरपिडीत करीत आहेत. पालिका प्रशासन तसेच राज्य सरकार आमच्या समस्येबाबत कानाडोळा करीत आहेत. आम्ही उध्वस्त झालो आहेत आम्हाला कोणीच वाली नाही अशा प्रकारची कडवट प्रतिक्रिया आपत्तीग्रस्त देत आहेत.
मात्र आपतीग्रस्त नागरीकांची शिवसेनेचे नगरसेवक तथा स्थायी समितीचे सभापती दिपेश म्हात्रे, भाजपा नगरसेवक विकास म्हात्रे, पालिका विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, नगरसेवक वामन म्हात्रे, कॉंग्रेसचे माजी नगरसेवक रवी पाटील, नगरसेविका संगीता मुकेश पाटील आदींनी आपापल्या प्रभागात नागरिकांची रिकाम्या इमारतीत रहाण्यासह जेवणाची सोय केली असल्याचे समोर येत आहे.
परिणामी आता नागरिकांच्या घरात चिखल झाला असून त्याची स्वच्छता करणे, फवारणी करणे, साथीचे आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक गोळ्यांचे वाटप करून वैद्यकीय आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याची जरुरी आहे. ज्या बांधकाम व्यावसायिकांनी कायदा मोडून बांधकाम केले त्याच्या विरुध्द एम.आर.टी.पी. कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी संसार उदध्वस्त झालेले हजारो नागरिक करीत आहेत.