पुणे : महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची सुरुवार करण्यासाठी भाजपा वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहे. मुंबईत हुतात्मा स्मारकाला वंदन केल्यानंतर प्रचाराची सुरुवात केल्यानंतर, आज भारतीय जनता पार्टी – आरपीआय युतीच्या उमेदवारांनी पुण्यात शिवछत्रपतींच्या साक्षीने सिंहगडावर सुराज्याची शपथ घेतली आणि महापालिका निवडणूक प्रचाराचा औपचारिक प्रारंभ केला. पारदर्शक, गतीमान, भ्रष्टाचारमुक्त आणि विकासाभिमूख सुशासन देण्यासाठी कटिबध्द असल्याची शपथ यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी उमेदवारांना दिली.
प्रदेश संघटनमंत्री रविंद्र भुसारी, पालकमंत्री गिरीश बापट,खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, शहराध्यक्ष योगेश गोगावले,आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, मेधा कुलकर्णी व रिपब्लिकन पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते.
केंद्र, राज्य आणि नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता संपादन केली, त्याचप्रमाणे राज्यातील महापालिका – जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप एक नंबरचा पक्ष बनेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे यांनी व्यक्त केला. प्रचारात आरोप-प्रत्यारोप न करता विकासावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी महापालिकेतील विजयासाठी कामास लागावे, असे आवाहनही त्यांनी केली.
पालकमंत्री बापट म्हणाले की, महापालिकेतील सत्ताधारी आघाडीने शहरातील प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे समस्या कमी न होता वाढतच गेल्या. त्यांच्याकडे विकास करण्यासाठी राजकीय इच्छा शक्ती नाही. दोन-अडीच वर्षात केंद्र व राज्यातील भाजप सरकारने शहराच्या विकासाबाबत अनेक महत्वाचे निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी सुरु केली. त्यामुळे पुणेकरांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण झाली असून पक्षाचा विजय निश्चिात आहे.