सिंधुदुर्गनगरी : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेच्या अंतर्गत जिल्ह्यात 45 हजार 890 पाच वर्षाआतील मुलांना पोलिओ लस देण्यात आली. ही मोहीम रविवारी यशस्वीपणे राबविण्यात आली. ९०८ लसिकरण बुथ, ७९ मोबाईल पथके व ४८ ट्रांझीट पथक याचा त्यात समावेश होता. २ हजारपेक्षा जास्त कर्मचारी व सुमारे २०० पर्यवेक्षकांनी कामकाजात सहभाग घेतला.
या वर्षी ४७ हजार ८०२ लाभार्थींना लसिकरण करण्याचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले होते. उद्दीष्टाच्या तुलनेत ९६.६० टक्के काम झाले. काही कारणांमुळे जी मुले बुथवर लसिकरण घेवू शकली नाहीत, अशा मुलांचा शोध घेवून त्यांनाही लसिकरण करण्यात येणार आहे. दिनांक ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी जाऊन अशा वंचित मुलांचा शोध घेतला जाणार आहे.
“सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने पोलिओच्या विरूध्दच्या लढाईमध्ये आतापर्यंत उत्तम योगदान दिले आहे. आता लढाई अंतिम टप्प्यात आहे, यापुढेही असेच सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाप्रशासनाने केले आहे. पल्स पोलिओ लसिकरणाचा पुढील टप्पा रविवार, दिनांक 2 एप्रिल रोजी असणार आहे. त्याहीवेळी असेच आपल्या पाच वर्षाआतील बाळांना पोलिओ लसिकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे.