मुंबई, विशेष प्रतिनिधी ः मुंबई- शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्ष भरात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची कार्य व निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवास स्थानी शनिवारी करण्यात आले. खासदार अनिल देसाई, खासदार धर्यशील माने यांची विशेष उपस्थिती होती.
विधान परिषद आमदार डॉ.मनीषा कायंदे यांनी त्यांच्या संकल्पने तून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील मंत्रिमंडळाने गेल्या वर्ष भरात घेतलेल्या सर्व निर्णयाची एकसंध मांडणी या पुस्तिकेच्या माध्यमातून समोर आणली आहे. सत्ता स्थापन झाल्यावर पहिल्याच वर्षी कोरोना महामारीचे महासंकट आले असताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने ही लढाई अधिक खंबीरपणे लढली, या सर्व लढाईत महाविकास आघाडीने घेतलेल्या लोकोपयोगी कामाची सविस्तर माहिती या पुस्तकात नमूद आहे. उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध करून देताना ५० हजार करोड रुपयांची गुंतवणूक आणण्याचे काम या एका वर्षात झाले आहे. नवतंत्रज्ञान वापरून शिक्षण पध्दतीत यशस्वी प्रयोग, ग्रामीण भागातील विकासासाठी अनेक चांगले निर्णय ठाकरे सरकारने घेतले आहेत. कोरोना काळात घेतलेल्या सर्व निर्णय प्रकिया तसेच जनतेसाठी उपलब्ध केलेल्या सोयी सुविधांची माहिती या पुस्तिकेत नमूद केली आहेत. आजच्या डिजिटल युगात सर्व माहिती एका क्लीकवर उपलब्ध असली तरी अनेक वेळा नागरिकांना आजही सरकारी निर्णयाची लिखित रुपी एकत्रित माहिती हवी असते त्यामुळे ही पुस्तिका नक्कीच उपयुक्त ठरेल असे मत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व्यक्त केले. कोरोनासारखे महाभयंकर संकट, केंद्र सरकारचे असहकार्य, विरोधी पक्षाची असंवेदनशील भूमिका असा सर्व विरोधाभास असतानाही मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेल्या अनेक लोकपयोगी निर्णयामुळे महाराष्ट्र थांबला नाही याउलट कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे यांना एक मोठा जनाधार मिळाला व त्यांनी केलेल्या कामाचे जागतिक स्तरावर कौतुकही झाले. हेच या महाविकास आघाडीचे यश आहे असे मत खासदार अनिल देसाई यांनी व्यक्त केले. ही पुस्तिका साकार करण्यासाठी मंत्री मंडळातील सर्वांनी सहकार्य केल्याची भावना शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली.