कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा, स्मार्ट सिटी कंट्रोल सेंटरचे उदघाटन
ठाणे, विशेष प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली शहरातील सर्व पायाभूत सुविधांबरोबरच शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असलेली लोकहिताची कामे प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शासन कटिबध्द आहे. सर्व विकासकामे जलदगतीने पुर्ण करुन लवकरात लवकर त्यांचे लोकार्पण करण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबिवलीकरांना दिला.
कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानक परिसर सुधारणा प्रकल्प पायाभरणी समारंभ तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण डोंबिवली मुख्यालयातील स्मार्टसिटी इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने झाले. कार्यक्रमस्थळी व्यासपीठावर नगरविकास, सार्वजनिक बांधकाम(सा.उ) तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मा. महापौर विनिता राणे, खासदार कपिल पाटील, डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण, विश्वनाथ भोईर, प्रमोद पाटील, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, माजी स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले स्मार्ट शहर विकसित करतांना समाजातील सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. लोकहिताची कामे विहित वेळेत व मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशासनाने नेहमीच जनतेला चांगली कामे करुन दाखविणे आवश्यक आहे.शहराचा विकास करताना नागरिक, सामाजिक संस्था यांना एकत्रित करुन एक संघटन तयार करावे. त्यांच्याशी समन्वय साधून शहर विकासाचा आराखडा तयार करावा. कल्याण डोंबिवली शहराचा विकास झपाट्याने होतो आहे. या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही ठाकरे यांनी दिली.
पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, स्थानिक परिसराचा विकास वेगाने होण्यास चालना मिळत आहे. सद्यस्थितीत स्टेशन परिसरात असलेली वर्दळ तसेच होणारी गर्दी करुन लक्षात घेऊन कल्याण स्टेशन परिसरातील वाहतुकीचे नियोजन करण्यात येत आहे.तसेच आजूबाजूच्या परिसराचे सुशोभिकरणं करणे हेही स्मार्ट सिटीच्या दृष्टीने आवश्यक असल्याने सर्व बाबींचा विचार करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. यामुळे प्रवासाची तसेच फेरीवाले आणि वाहनचालक यांची सोय होणार आहे. कल्याण डोंबिवली शहरामध्ये स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत विविध प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत. आगामी काळात शहराचा विकास झपाट्याने होईल. शहराच्या विकासकामांना, प्रकल्पांना गती मिळाली असल्याचेही पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी खासदार कपिल पाटील यांचेही भाषण झाले.
प्रस्ताविक करताना आयुक्त विजय सूर्यवंशी म्हणाले की,स्मार्ट सिटी अभियानांतर्गत कल्याण डोंबिवली शहरामध्ये विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.यामध्ये कल्याण स्टेशन परिसर सुधारणा हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वाहतुक मार्ग वेगळे करण्यासाठी बैलबाजार चौक ते सुभाष चौक उड्डाणपूल वाहनतळाच्या इमारतीची पुर्नबांधणी, बस, डेपो पुर्नविकास तसेच स्मार्ट रस्ते विकसित करुन सीसीटिव्ही यंत्रणा व सिग्नल व्यवस्था तसेच परिसराचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. या कामाकरीता 498 कोटी रु.खर्च अपेक्षित असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. भूमीपूजन सोहळ्यानंतर कल्याण डोंविबली महापालिका मुख्यालयातील स्मार्टसिटी ऑपरेशनसेंटर मध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, कल्याण परिसरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी बसविलेल्या 8 सिग्नल यंत्रणेचे उदघाटन करण्यात आले. ही सिग्नल यंत्रणा कार्यन्वित झाल्यानंतर एखादया वाहन चालकाने सिग्नल तोडल्यास सिग्नल यंत्रणेतील स्वयंचलित कॅमेऱ्याने त्याचा फोटो काढला जाऊन ज्याच्या नावावर वाहन रजिस्टर असेल त्याला इ-चलान म्हणजेच थेट दंडाचा संदेश प्राप्त होणार आहे याचे प्रात्यक्षिक उपस्थित मान्यवरांना यावेळी दाखवण्यात आले.