मुंबई : रेल्वे स्थानक नसलेल्या पण महत्वाच्या ठिकाणच्या प्रवाशांची, रेल्वे आरक्षण करतांना होणारी गैरसोय आणि अडचण टाळण्यासाठी, महाड इथल्या टपाल कार्यालयात येत्या 16 तारखेपासून प्रवासी आरक्षण यंत्रणा (पी आर एस) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दक्षिण रायगड जिल्ह्यातली ही पहिली टपाल पी आर एस आहे. महाड शहराच्या मध्यवर्ती भागात टपाल कार्यालय आहे. महाड टपाल कार्यालय पी आर एस मुळे, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धन तालुक्यातल्या प्रवाश्यांची सोय होणार आहे.
महाड तालुक्यात सध्या कुठेही पी आर एस सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना महाडपासून 35 किलोमीटरवरच्या माणगाव इथे जावे लागते. या नव्या पी आर एस मुळे, रायगड जिल्ह्यातल्या, महाड, पोलादपूर आणि श्रीवर्धन तालुक्यातल्या प्रवाश्यांची सोय होणार असून महाड शहर आणि महाड औद्योगिक भागाची प्रदीर्घ काळाची मागणी पूर्ण होणार आहे.
कोकण रेल्वे, आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासासाठी नेहमीच उत्तम प्रवासी सुविधा देण्यासाठी झटत असते.