डोंबिवली, प्रतिनिधी: शहरातील पक्षी, अभयारण्य, निसर्गप्रेमींनी ‘म्हाडा हटवा, टेकडी वाचवा’ ‘डोंबिवलीचा श्वास हिरावून घेऊ नका पर्यावरणाचे रक्षण करा’ अशी घोषणा देत डोंबिवली जवळील उंबर्ली टेकडीवर शासना विरोधात निदर्शने केली. `माझी वसुंधरा` हा उपक्रम शासनाच्यावतीने राज्यात राबविला जात आहे. मात्र दुसरीकडे वनविभागाच्या जमिनीवर म्हाडा सारखे प्रकल्प उभारले जात असल्याने शासनाचे `पर्यावरण रक्षण` हे नाटक आहे असा जाहीर आरोप निसर्गप्रेमींनी केला.
आंदोलनात मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, निसर्गप्रेमी राजेश कदम, बंडू पाटील, सारिका चव्हाण, मंगेश कोयंडे, महेश निंबाळकर, समीर भोईर, जगदीश ठाकूर, राजेंद्र नांदोस्कर, मुकेश पाटील, डॉ. नंदा, गायत्री ओक आदी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते. दरम्यान निदर्शनानंतर म्हाडा प्रकल्प अधिकारी सुधीर भारांडे, वनविभागाचे अधिकारी कल्पना वाघेरे व आमदार पाटील यांच्यामध्ये या विषयावर चर्चा झाली. आमदार पाटील म्हणाले, उंबर्ली टेकडीवर म्हाडाचे प्रकल्प राबविले जाणार नाही. सर्वे नंबर १६२ वर म्हाडाला शासनाने दिला आहे. त्या बाहेर काम जाणार नाही. उंबर्ली टेकडी बाबत प्रकल्प अधिकारी कल्पना वाघेरे म्हणाल्या, वनविभागाला नागरिकांचे पूर्णपणे सहकार्य मिळाले पाहिजे. संगनमताने जी चर्चा होईल त्यावर मार्ग निघेल. यावेळी निसर्गप्रेमी राजेश कदम म्हणाले, `माझी वसुंधरा` हा नवीन उपक्रम शासनाच्या वतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात राबविला जात आहे. पण दुसरीकडे मात्र पर्यावरणाच्या विरोधात जाऊन वन विभगाच्या जागेवर शासनाने म्हाडा प्रकल्प राबविला. याचा निसर्ग प्रेमींनी एकत्र येऊन निषेध केला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणीहि कदम यांनी केली. तर या निदर्शनास बालकाकांपासून ते ज्येष्ठ नागरीक सहभागी झाले होते. हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून निसर्ग वाचवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नातून शासन लवकर जागे झाले नाही तर लाखोंच्या संख्येने निसर्गप्रेमी टेकडीवर एकत्र येऊन जनांदोलन करू असा इशारा निसर्गप्रेमींनी दिला.