मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) इथे ८ कनेक्टीव्हीटी प्रकल्पांची पायाभरणी केंद्रीय नौवहन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. सुमारे १११७ कोटींच्या या प्रकल्पामुळे जेएनपीटी अंतर्गत भागाशी जोडले जाणार आहे. रेल्वे लाईन, रेल्वे यार्ड, पूल, ट्रॅक्टर-ट्रेलर साठी पार्किंग, जहाज थांबण्यासाठी सुविधा आदींचा यात समावेश आहे.
सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मोठी गुंतवणूक अपेक्षित असून यामुळे भारतीय निर्यातीला मोठी चालना मिळेल तसेच रोजगाराच्या नवीन संधी तसंच चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होतील असे गडकरी यांनी यावेळी बोलतांना सांगितले. जेएनपीटी सेझ विभागात कारखाने उभारण्यासाठी अनेक कंपन्यांनी स्वारस्य दाखवलं आहे, असंही ते म्हणाले. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन बंदर भागातील आणि भोवतालच्या परिसरातील विकासाला चालना देणे हे सरकारचे उद्दिष्ट असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
जागतिक दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यावर पोर्ट ट्रस्टने लक्ष केंद्रीत केले असून याद्वारे मुक्त व्यापाराला चालना मिळेल तसेच उद्योग सुलभीकरणातही योगदान वाढेल असे जेएनपीटीचे अध्यक्ष अनिल डिग्गीकर यांनी सांगितले